घरक्रीडाअश्विनच्या गुणवत्तेबाबत अजूनही शंका?

अश्विनच्या गुणवत्तेबाबत अजूनही शंका?

Subscribe

अश्विनला कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ७८ सामन्यांमध्ये ४०९ विकेट घेण्यात यश आले आहे. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत अनिल कुंबळे (६१९), कपिल देव (४३४) आणि हरभजन सिंग (४१७) यांच्या पाठोपाठ अश्विनचा चौथा क्रमांक लागतो. परंतु, अश्विनला अजूनही म्हणावा तसा मान दिला जात नाही. त्याच्या परदेशातील, विशेषतः आशिया बाहेरील कामगिरीवर नेहमी टीका केली जाते. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आणि इंग्लंडचा जेम्स अँडरसन यांनाही घरच्या मैदानावर केलेल्या कामगिरीच्या तुलनेत परदेशात फारसे यश मिळालेले नाही. मात्र, त्यांची क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांमध्ये गणना होते. मग इतर गोलंदाजांसाठी एक न्याय व अश्विनसाठी वेगळा का?

‘दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये त्याला फारशा विकेट मिळवता आलेल्या नाहीत. त्यामुळे क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंबाबत चर्चा करताना अजून त्याचे नाव घेणे योग्य ठरणार नाही. ‘ऑल टाइम ग्रेट’ ही क्रिकेटपटूला मिळणारी सर्वात मोठी पदवी आहे. डॉन ब्रॅडमन, सोबर्स, गावस्कर, तेंडुलकर, विराट आदींना मी क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू मानतो,’ असे काही दिवसांपूर्वी भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर म्हणाले होते. ते भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनविषयी बोलत होते.

अश्विनला कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ७८ सामन्यांमध्ये ४०९ विकेट घेण्यात यश आले आहे. त्याने तब्बल ३० वेळा एका डावात पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत अनिल कुंबळे (६१९), कपिल देव (४३४) आणि हरभजन सिंग (४१७) यांच्या पाठोपाठ अश्विनचा चौथा क्रमांक लागतो. कुंबळे, कपिल आणि हरभजन यांची केवळ भारतीय क्रिकेट नाही, तर जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांमध्ये गणना होते. परंतु, अश्विनला मात्र अजूनही म्हणावा तसा मान दिला जात नाही.

- Advertisement -

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि रणजीमध्ये तामिळनाडू संघाकडून दमदार कामगिरी केल्यावर अश्विनची भारतीय संघात निवड झाली. त्याला सर्वात आधी २०१० मध्ये एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. तर पुढील वर्षी म्हणजेच २०११ मध्ये तो पहिल्यांदा कसोटी क्रिकेट खेळला. वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पणातच त्याने ९ विकेट घेण्याची किमया साधली आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याने अवघ्या १८ कसोटीत १०० विकेट, ३७ कसोटीत २०० विकेट, ५४ कसोटीत ३०० विकेट आणि ७७ कसोटीत ४०० विकेट घेण्याचा पराक्रम केला.

भारतीय खेळपट्ट्यांवर अश्विनविरुद्ध खेळणे हे जणू अशक्यप्राय आव्हान मानले जाते. परंतु, त्याला दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये फारसे यश मिळत नाही अशी टीका होते. अश्विनने भारतात ४७ कसोटी सामन्यांत २८६ विकेट घेतल्या असून परदेशात त्याला ३१ सामन्यांत १२३ विकेट घेण्यात यश आले आहे. त्याने ऑस्ट्रेलियात १० कसोटीत ३९ गडी, इंग्लंडमध्ये ६ कसोटीत १४ गडी बाद केले आहेत. या कामगिरीनंतरही अश्विनच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित करणे योग्य आहे का?

- Advertisement -

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनचा अव्वल क्रमांक लागतो. कसोटीत त्याच्या नावे ८०० विकेट आहेत. यापैकी ६१२ विकेट या मुरलीधरनने आशियामध्ये घेतल्या. तसेच या यादीत चौथ्या स्थानावर असलेल्या जेम्स अँडरसनने आतापर्यंत ६१७ विकेट घेतल्या असून इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजाने घरच्या मैदानावर ३८८ विकेट घेतल्या आहेत. आशियात ४७ डावांत त्याला केवळ ७४ गडी बाद करता आले आहे. मग इतर गोलंदाजांसाठी एक न्याय व अश्विनसाठी वेगळा का?

भारतीय संघ यावर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यापूर्वीही अश्विनच्या गुणवत्तेबाबत बरीच चर्चा झाली होती. परंतु, त्याने पुन्हा एकदा स्वतः सिद्ध करताना तीन सामन्यांत १२ मोहरे टिपले. याऊलट ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नेथन लायन चार सामन्यांमध्ये नऊ विकेटच घेऊ शकला. अश्विनला आता पुन्हा एकदा आपल्या टीकाकारांची तोंडं बंद करायची संधी मिळणार आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला असून या दौऱ्यात न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि त्यानंतर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या एकूण सहा कसोटी सामन्यांत अश्विन कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल, हे निश्चित.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -