घरक्रीडाकुलदीपचं घोडं अडतंय कुठं?

कुलदीपचं घोडं अडतंय कुठं?

Subscribe

कुलदीपने आतापर्यंत ६ कसोटी सामने खेळले असून त्यात २४ विकेट घेतल्या आहेत. मात्र, त्याने अखेरचा कसोटी सामना जानेवारी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियात खेळला होता. सिडनी येथे झालेल्या या कसोटीत त्याने ५ विकेट घेतल्या. या सामन्यानंतर 'परदेशात होणाऱ्या कसोटी सामन्यांत कुलदीप आमचा प्रमुख फिरकीपटू असेल,' असे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते. शास्त्री यांच्या विधानानंतर भारताने दोन वर्षांत ११ कसोटी सामने खेळले असून कुलदीपला एकाही सामन्यात संधी मिळालेली नाही.    

इंग्लंडविरुद्ध सध्या सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने संघनिवडीत काही आश्चर्यकारक निर्णय घेतले. चेन्नईतील खेळपट्टी पहिले एक-दोन दिवस फलंदाजीसाठी अनुकूल असतील असे म्हटले जात होते आणि तसेच झाले. याचा इंग्लंडच्या संघाने आणि कर्णधार जो रूटने पुरेपूर फायदा घेतला. आपला शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या रूटने कारकिर्दीतील पाचवे द्विशतक झळकावले. रूटसह इंग्लंडच्या सर्वच फलंदाजांनी अप्रतिम खेळ केला. त्यामुळे त्यांना श्रेय हे मिळालेच पाहिजे. मात्र, त्यांना भारतीय संघ व्यवस्थापनाने थोडी मदत केली असे म्हणणेही वावगे ठरू नये.

चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर होत असलेल्या या कसोटीत भारतीय संघ तीन फिरकीपटू घेऊन मैदानात उतरेल आणि चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. भारताने तीन फिरकीपटू खेळवण्याचा निर्णय तर घेतला, पण यात कुलदीपचा समावेश मात्र नव्हता. भारताने या कसोटीत अश्विन, वॉशिंग्टन सुंदर आणि मूळ संघात नसलेल्या शाहबाझ नदीमला संधी दिली. त्यामुळे आता कुलदीपच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

- Advertisement -

‘कुलदीपला न खेळवण्याचा भारताचा निर्णय अतिशय चुकीचा होता. इतक्या खेळाडूंना दुखापती असतानाही कुलदीपला संधी मिळत नसेल, तर कधी मिळेल,’ असे म्हणत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने भारतीय संघ व्यवस्थापनावर टीका केली. तसेच कुलदीपसाठी अनेकांना वाईटही वाटले आणि याला कारणही तसेच आहे.

२०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कुलदीपने आतापर्यंत ६ सामने खेळले असून त्यात २४ विकेट घेतल्या आहेत. मात्र, त्याने अखेरचा कसोटी सामना जानेवारी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियात खेळला होता. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या कसोटीच्या पहिल्या डावात ५ विकेट घेण्याची किमया त्याने साधली होती. या सामन्यानंतर ‘परदेशात होणाऱ्या कसोटी सामन्यांत कुलदीप आमचा प्रमुख फिरकीपटू असेल,’ असे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते.

- Advertisement -

शास्त्री यांच्या विधानानंतर भारताने दोन वर्षांत ११ कसोटी सामने खेळले असून कुलदीपला एकाही सामन्यात संधी मिळालेली नाही. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताच्या बऱ्याच प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्या. त्यामुळे भारताला या मालिकेत तब्बल २१ खेळाडू खेळवावे लागले आणि केवळ एकच खेळाडू असा होता जो एकही सामना खेळला नाही. तो खेळाडू म्हणजे कुलदीप.

ब्रिस्बन येथे झालेल्या अखेरच्या कसोटीत कुलदीप खेळेल असे वाटत असतानाच भारताने नेट्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी ऑस्ट्रेलियात थांबवण्यात आलेल्या वॉशिंग्टन सुंदरला पदार्पणाची संधी दिली. तर सध्या सुरु असलेल्या चेन्नई कसोटीत अक्षर पटेलला दुखापत झाल्यानंतर भारताने मूळ संघात नसलेल्या शाहबाझ नदीमला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिले.

कुलदीपकडे पुन्हा दुर्लक्ष केले गेले ही बाब मोहम्मद कैफसारख्या भारताच्या काही माजी खेळाडूंना फारशी आवडली नाही. भारतीय संघाला कुलदीपकडून नक्की काय अपेक्षा आहेत? हेच कळत नसल्याची टीकाही कर्णधार विराट कोहली आणि भारताच्या संघ व्यवस्थापनावर झाली. परंतु, इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय फिरकीपटूंनी केलेली कामगिरी पाहता कुलदीपला दुसऱ्या कसोटीत संधी मिळण्याची दाट शक्यता असून त्याचा या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न असेल हे निश्चित.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -