Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा WI vs AUS : लुईसची फटकेबाजी; कांगारूंविरुद्ध विंडीजचा विजयी चौकार

WI vs AUS : लुईसची फटकेबाजी; कांगारूंविरुद्ध विंडीजचा विजयी चौकार

विंडीजने पाच सामन्यांची ही टी-२० मालिका ४-१ अशा मोठ्या फरकाने जिंकली.

Related Story

- Advertisement -

सलामीवीर एव्हिन लुईसच्या फटकेबाज अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने पाचव्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर १६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह विंडीजने पाच सामन्यांची ही टी-२० मालिका ४-१ अशा मोठ्या फरकाने जिंकली. टी-२० वर्ल्डकपच्या गतविजेत्या विंडीजला यंदा आपले जेतेपद राखण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाला अगदी सहज पराभूत करत टी-२० वर्ल्डकपमधील इतर संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. अखेरच्या टी-२० सामन्यात विंडीजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १९९ अशी धावसंख्या उभारली आणि २०० धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला २० षटकांत ९ बाद १८३ धावांवर रोखले.

लुईसच्या ३४ चेंडूत ७९ धावा

या सामन्यात विंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. विंडीजचा सलामीवीर लुईसने सुरुवातीपासूनच आक्रमक शैलीत फलंदाजी करत २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याने फटकेबाजी सुरु ठेवत ३४ चेंडूत ४ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ७९ धावांची खेळी केली. तसेच क्रिस गेल (७ चेंडूत २१), लेंडल सिमन्स (२५ चेंडूत २१) आणि कर्णधार पूरन (१८ चेंडूत ३१) यांच्या चांगल्या फलंदाजीमुळे विंडीजने २० षटकांत ८ बाद १९९ अशी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाकडून अँड्र्यू टायने तीन विकेट घेतल्या.

कॉट्रेल, रसेलच्या ३-३ विकेट

- Advertisement -

२०० धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जॉश फिलिपे खातेही न उघडता बाद झाला. कर्णधार फिंच (२३ चेंडूत ३४) आणि मिचेल मार्श (१५ चेंडूत ३०) यांनी काही चांगली फलंदाजी केल्यावर त्यांना अनुक्रमे हेडन वॉल्श आणि आंद्रे रसेल यांनी माघारी पाठवले. यानंतर मॅथ्यू वेड (१८ चेंडूत २६) वगळता ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला २५ धावांचा टप्पा पार करता आला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला २० षटकांत ९ बाद १८३ धावाच करता आल्या. विंडीजकडून शेल्डन कॉट्रेल आणि रसेल यांनी ३-३ विकेट घेतल्या.

- Advertisement -