घरक्रीडाधोनीकडे दुर्लक्ष कशासाठी करू?

धोनीकडे दुर्लक्ष कशासाठी करू?

Subscribe

निवड समिती सदस्याचे विधान

माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीची आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली नाही. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर धोनी निवृत्त होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, त्याने याबाबतची कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, असे असतानाही त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवड न झाल्याने धोनीकडे निवड समिती दुर्लक्ष करत आहे का, धोनी आता संपला असे त्यांना वाटत आहे का, असे प्रश्न बर्‍याच क्रिकेट समीक्षकांनी उपस्थित केले. परंतु, यात काहीही तथ्य नसून आम्ही धोनीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे विधान निवड समितीच्या एका सदस्याने केले.

धोनीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. लोकांचा काहीतरी गैरसमज होत आहे. पुढील वर्षी होणारा टी-२० विश्वचषक लक्षात घेऊन धोनीने आम्हाला योजना आखण्यास वेळ दिला आहे. लोकांच्या मतांपेक्षा संघाचे हित जास्त महत्त्वाचे आहे, हे त्याला कळते. तसेच रिषभ पंतला दुखापत झाल्यास मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपल्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने धोनीने निवृत्त न होण्याचा निर्णय घेतला. सध्या धोनीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्नच नाही. वेस्ट इंडिज दौर्‍याआधी त्याने दोन महिन्यांसाठी आपण क्रिकेट खेळणार नसल्याचे सांगितले होते. तो कालावधी पूर्ण झाला आहे, असे मला वाटत नाही, असे निवड समिती सदस्य म्हणाला.

- Advertisement -

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर निवड समितीने धोनीशी भविष्याबाबत चर्चा केली आहे का, असे विचारले असता या सदस्याने सांगितले, नाही. आम्ही धोनीसोबत अजून चर्चा केलेली नाही. त्याने आम्हाला पुढील योजना आखण्यासाठी वेळ दिला आहे. पंतला दुखापत झाली किंवा इतर काही कारणांमुळे तो टी-२० विश्वचषकात खेळू शकला नाही, तर धोनीशिवाय भारताकडे दुसरा तयार पर्याय उपलब्ध नाही.

संघ व्यवस्थापनाला धोनीचे महत्त्व माहीत आहे!

महेंद्रसिंग धोनीने मागील १०-१२ वर्षे भारतीय संघात फिनिशरची भूमिका पार पाडली आहे. ही भूमिका पार पाडण्यासाठी भारताकडे दुसरा खेळाडू उपलब्ध नसल्याने धोनी अजूनही महत्त्वाचा खेळाडू असू शकतो, असे निवड समितीच्या सदस्याला वाटते. संघ व्यवस्थापनाला धोनी किती महत्त्वाचा खेळाडू आहे, हे माहीत आहे. धोनीने गेली अनेक वर्षे फिनिशरची भूमिका पार पाडली आहे आणि ही भूमिका पार पाडण्यासाठी भारताकडे अजूनही दुसरा खेळाडू उपलब्ध नाही. ज्या खेळाडूने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे, त्याला फिनिशर असणे किती अवघड असते हे माहीत आहे. एखादा खेळाडू जेव्हा ३५० एकदिवसीय आणि ९८ टी-२० सामने खेळतो, तेव्हा त्याच्या खेळाबाबत बोलणे आणि टीका करणे सोपे होते. मात्र, त्याने जितके सामने भारताला जिंकवले आहेत, तितके सामने अनेकांनी पाहिलेले नाहीत, असे निवड समिती सदस्य म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -