रोहित कसोटीवर उतरणार?

रोहित शर्मा

भारतीय कसोटी संघाला गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवागनंतर सातत्यपूर्ण कामगिरी करणारी सलामीची जोडी मिळालेली नाही. त्यामुळे भारतीय कसोटी संघात सलामीवीरांच्या संगीत खुर्चीचा खेळ सुरु आहे. या खेळात मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ यांच्यासारख्या खेळाडूंचा सहभाग होता. मात्र, यापैकी एकही कसोटीवर उतरला नाही. त्यामुळे अखेर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या रोहित शर्माला कसोटीतही सलामीला पाठवण्याचा भारतीय संघाने निर्णय घेतला आहे. रोहितला कसोटीत सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे पदार्पणानंतर ६ वर्षांनी का होईना, रोहित कसोटी संघात आपले स्थान पक्के करेल आणि सलामीचा प्रश्न सोडवेल, अशी संघ व्यवस्थापन आशा करत असेल.

रोहित शर्मासारखा प्रतिभावान खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये का यशस्वी होत नाही?, काय केले म्हणजे रोहित कसोटीत सातत्यपूर्ण कामगिरी करेल?, असे प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला वारंवार पडत होते. मात्र, याचे उत्तर काही केल्या मिळत नव्हते. अखेर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने एक पर्याय सुचवला आणि रोहितला पुन्हा एकदा आपली कसोटी कारकीर्द रुळावर आणण्याची संधी मिळाली आहे. रोहितला नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत एकही सामना खेळायला मिळाला नाही. रोहितने काही महिन्यांपूर्वी झालेल्या वर्ल्डकपमध्ये ५ शतके झळकावली होती. तो चांगल्या फॉर्मात होता.

त्यामुळे काहीही करून संघ व्यवस्थापनाने त्याच्यासाठी कसोटी संघात जागा करायला हवी असे गांगुलीला वाटत होते आणि त्याने रोहितला मर्यादित षटकांप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्येही सलामीवीर म्हणून खेळवण्याचा सल्ला दिला. लोकेश राहुलची मागील काही काळातील निराशाजनक कामगिरी लक्षात घेऊन निवड समितीने त्याला आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी डच्चू देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी सलामीवीर म्हणून (गांगुलीने सांगितल्याप्रमाणे) रोहितची निवड केली. त्यामुळे रोहित आता कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला येत कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

रोहितने २०१३ साली वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना सलग दोन शतके लगावली. त्यामुळे साहजिकच त्याच्याकडून खूप अपेक्षा निर्माण झाल्या. मात्र, पदार्पणानंतर सहा वर्षांनीही रोहितला कसोटी संघात आपले स्थान पक्के करता आलेले नाही. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस लक्ष्मण, सौरव गांगुली हे महान फलंदाज निवृत्त झाल्यानंतर रोहित आणि विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजीची धुरा सांभाळतील अशी सर्वांना आशा होती. कोहलीने फलंदाज म्हणून आणि कर्णधार म्हणूनही आपली छाप पाडली. नुकत्याच झालेल्या विंडीजविरुद्धच्या मालिकेत तो कसोटी क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार झाला. त्याच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत २८ कसोटी सामने जिंकले आहेत. दुसरीकडे रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये खेळलेल्या सामन्यांची संख्या आहे २७. रोहितने या सामन्यांच्या ४७ डावांमध्ये ३९.६२ च्या सरासरीने १५८५ धावा केल्या आहेत, ज्यात केवळ ३ शतकांचा समावेश आहे.

याच रोहितने टी-२० आणि खासकरून एकदिवसीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मधल्या फळीत खेळताना रोहितला कारकिर्दीच्या सुरुवातीला फारसे यश मिळाले नाही. परंतु, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने २०१३ साली रोहितला सलामीवीर म्हणून खेळवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची कारकीर्द बहरली. एकूण ४८.५३ च्या सरासरीने धावा करणार्‍या रोहितची सलामीवीर म्हणून सरासरी आहे जवळपास ६० ची. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळताना आतापर्यंत १३२ डावांमध्ये ६७१९ धावा केल्या आहेत. यामध्ये २५ शतके आणि ३० अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याच्या नावावर विक्रमी ३ द्विशतकेही आहेत.

गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवागनंतर भारताला सातत्यपूर्ण कामगिरी करणारी सलामीची जोडी मिळालेली नाही. भारतीय कसोटी संघात सलामीवीरांच्या संगीत खुर्चीचा खेळ सुरु आहे. या खेळात मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ यांच्यासारख्या खेळाडूंचा सहभाग होता. मात्र, यापैकी एकही कसोटीवर उतरला नाही. २०१८ नंतर राहुलला सर्वाधिक २३ डाव खेळण्याची संधी मिळाली, पण त्याला केवळ २२.३१ च्या सरासरीने धावा करता आल्या. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीला येत दमदार कामगिरी करणार्‍या रोहितला अखेर कसोटीतही सलामीवीर म्हणून खेळवण्याचा भारताने निर्णय घेतला आहे. आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत तो मयांक अगरवालसोबत भारताच्या डावाची सुरुवात करेल.

कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळण्याची रोहितची ही पहिलीच वेळ असेल. त्यातच त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही सलामी करण्याचा फारसा अनुभव नाही. त्याने रणजी करंडकात केवळ तीन वेळा मुंबईच्या डावाची सुरुवात केली आहे आणि यात त्याने एकदा अर्धशतकी खेळी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रोहितला ५ वेळा तिसर्‍या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा त्याला फारसा उपयोग करता आला नाही. त्याने ५ डावांमध्ये २१ च्या सरासरीने १०७ धावा केल्या. धवन, राहुलप्रमाणेच रोहितकडे कसोटीत सलामीवीर म्हणून खेळण्यासाठी लागणारा संयम नाही, अशीही टीका होत असते. त्यामुळे त्याला सलामीला पाठवून भारत धोका तर पत्करत नाही ना, असा प्रश्न पडतो.

मात्र, ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू म्हणजे सेहवागवरही आक्रमक फलंदाजाचा शिक्का लागला होता. त्याच्यात संयमाची कमतरता आहे असे म्हटले जायचे. परंतु, त्याला हा शिक्का पुसून काढण्यात यश आले. सेहवाग कसोटी क्रिकेटमध्ये सुनील गावस्कर यांच्यानंतरचा सर्वोत्तम भारतीय सलामीवीर म्हणून ओळखला जातो. सेहवागनेही आपल्या कारकिर्दीची सुरुवात मधल्या फळीत केली होती. त्यामुळे रोहित आता सेहवागप्रमाणेच कसोटीही यशस्वी होईल, अशी संघ व्यवस्थापन आशा करत असेल हे निश्चित.