घरक्रीडा१९८३ विश्वचषकाची होणार पुनरावृत्ती?

१९८३ विश्वचषकाची होणार पुनरावृत्ती?

Subscribe

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या एकेकाळच्या बलाढ्य संघांव्यतिरिक्त केवळ भारतच असा एक संघ आहे, ज्याने क्रिकेट विश्वचषक ही स्पर्धा एकपेक्षा जास्त वेळा जिंकली आहे. १९८३ मध्ये इंग्लंडमध्ये झालेला विश्वचषक जिंकत कपिल देवच्या भारतीय संघाने संपूर्ण क्रिकेट जगताला आपली दखल घेण्यासाठी भाग पाडले. भारतातही या विश्वविजयामुळे क्रिकेटचे चित्र पालटले. पूर्वी तितकीशी प्रसिद्धी नसलेला हा खेळ आता या देशातील सर्वात लोकप्रिय खेळ बनला आहे. त्यानंतर भारताने २०११ मध्ये दुसर्‍यांदा विश्वचषक जिंकत नवा इतिहास रचला. भारत, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांना या विश्वचषकाचे यजमानपद मिळाले होते आणि त्यामुळे आपल्या घरच्या मैदानावर झालेला विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला होता. त्या विश्वचषकानंतरही भारताने आपला दबदबा कायम ठेवला आहे. भारतीय संघाने मागील (२०१५) विश्वचषकातही उपांत्य फेरी गाठली होती, तर २०१७ मध्ये इंग्लंडमध्येच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास या संघाने केला होता. त्यामुळे ३० मेपासून इंग्लंडमध्ये होणारा विश्वचषक जिंकण्याचे भारताला प्रमुख दावेदार मानले जात आहे. आता विराट कोहलीचा हा संघ अपेक्षित कामगिरी करत तिसर्‍यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये २०१५ साली झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा तो विश्वचषक जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता. मात्र, त्याआधी या संघाने अप्रतिम कामगिरी करत ७ पैकी ७ सामने जिंकले होते. त्यामुळे त्या विश्वचषकात खेळणारे महेंद्रसिंग धोनी, कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी हे प्रमुख खेळाडू या विश्वचषकातही भारतीय संघाचा भाग असणार आहेत. मागील विश्वचषकात भारताची गोलंदाजी ही कमकुवत बाजू मानली जात होती. मात्र, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, फिरकी जोडगोळी कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्या समावेशामुळे भारताची गोलंदाजी आणि फलंदाजी यांच्यात फार तफावत उरलेली नाही. त्यामुळे सध्याचा भारतीय संघ हा जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक म्हणून ओळखला जातो. कोहलीला कर्णधार म्हणून या विश्वचषकाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी धोनीने जानेवारी २०१७ ला मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद सोडले होते. कोहलीच्या नेतृत्त्वात भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ६८ सामने खेळले असून, त्यापैकी ४९ सामने जिंकले आहेत. तसेच २०१८च्या सुरुवातीपासून भारताने ६ एकदिवसीय मालिका खेळल्या असून, त्यापैकी ४ मालिका जिंकल्या आहेत आणि याच काळात त्यांनी आशिया चषकही जिंकला. त्यातच या संघात कोहलीच्या रूपात जगातील सर्वोत्तम फलंदाज आणि बुमराहच्या रूपात सर्वोत्तम गोलंदाज असल्याने हा संघ विश्वचषकात दमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.

- Advertisement -

जमेची बाजू – सध्याच्या भारतीय संघात जगातील सर्वोत्तम सलामीची जोडी (रोहित शर्मा आणि शिखर धवन), सर्वोत्तम फलंदाज (विराट कोहली), सर्वोत्तम फिनिशर (महेंद्रसिंग धोनी), सर्वोत्तम गोलंदाज (जसप्रीत बुमराह) आहे असे म्हटले जाते. तसेच या संघात सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक हार्दिक पांड्याही आहे. पांड्याने नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. चायनामन कुलदीप यादव आणि लेगस्पिनर युझवेंद्र चहल यांनीही मागील २ वर्षांत खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच हा संघ विश्वचषक जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार मानला जात आहे. या संघात धोनीच्या रूपात याआधी विश्वचषक जिंकणारा कर्णधारही आहे आणि याचा फायदा आताचा कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण संघाला होईल, अशी अपेक्षा आहे.

कमकुवत बाजू – विश्वचषकासाठी भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हा अजूनही प्रश्न आहेच. अष्टपैलू विजय शंकर या स्थानावर खेळेल, असे निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के प्रसाद या संघाची घोषणा करताना म्हणाले होते. मात्र, त्याच्याकडे फारसा अनुभव नसल्याने लोकेश राहुलही या क्रमांकावर खेळण्यासाठी पर्याय मानला जात आहे, परंतु राहुलचीही एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी खास नाही. त्यामुळे या क्रमांकावर कोण खेळणार हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. तसेच भारताने या संघात तीनच प्रमुख वेगवान गोलंदाज निवडल्याने एखाद्या गोलंदाजाला दुखापत झाल्यास संघ अडचणीत पडू शकेल.

- Advertisement -

विश्वविजेते – २ वेळा (१९८३, २०११)

(खेळाडूवर लक्ष)
•जसप्रीत बुमराह [गोलंदाज]
•एकदिवसीय सामने : ४९
•विकेट : ८५
•सरासरी : २२.१५
•इकोनॉमी : ४.५१
•सर्वोत्तम : ५/२७

विश्वचषकासाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, केदार जाधव, विजय शंकर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी

(संकलन – अन्वय सावंत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -