घरक्रीडायुवराज होणार निवृत्त?

युवराज होणार निवृत्त?

Subscribe

भारताचा विस्फोटक फलंदाज युवराज सिंग सध्या निवृत्तीच्या विचारात आहे. युवराजने २०१७ नंतर भारताकडून एकही सामना खेळलेला नाही. तसेच त्याला स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश येत असल्याने भविष्यातही त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच तो आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होऊन परदेशात होणार्‍या टी-२० स्पर्धांमध्ये खेळण्याचा विचार करत आहे. मात्र, बीसीसीआय जेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मान्यतेने होणार्‍या परदेशातील टी-२० स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी देईल, तेव्हाच तो निवृत्तीचा निर्णय घेणार आहे.

आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून युवराज निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. त्यासंदर्भात तो बीसीसीआयशी चर्चाही करणार आहे. मात्र, जीटी२० (कॅनडा), युरो टी२० स्लॅम (आयर्लंड) आणि हॉलंड येथे होणार्‍या टी-२० लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळाल्यावरच युवराज काय तो निर्णय घेईल, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच भारताचा गोलंदाज इरफान पठाणला कॅरेबियन प्रीमियर लीगच्या लिलावात खेळाडूंच्या यादीत स्थान देण्यात आले आहे, परंतु त्याने बीसीसीआयकडून परवानगी घेतलेली नाही. इरफान अजूनही प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत असल्यामुळे त्याने कॅरेबियन लीगमधून माघार घ्यावी, असे त्याला सांगण्यात आले आहे. युवराज प्रथम श्रेणी क्रिकेटमधून जरी निवृत्त झाला, तरी तो टी-२० खेळत राहणार असल्याने त्याची बीसीसीआयकडे सध्या खेळत असलेला खेळाडू म्हणून नोंद होईल. त्यामुळे त्याला परदेशातील टी-२० स्पर्धांत खेळण्यासाठी परवानगी देण्याआधी आम्हाला नियम पाहावे लागतील, असेही बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -