घरक्रीडान्यूझीलंडची ’विल’पॉवर

न्यूझीलंडची ’विल’पॉवर

Subscribe

विराट कोहली, जो रूट, स्टिव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन हे चौघे सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखले जातात. या चौघांनीही मागील चार-पाच वर्षांत आपल्या फलंदाजीचा स्तर फार उंचावला आहे. त्यामुळे या चौघांपैकी सर्वोत्तम कोण, यावर चाहत्यांमध्ये सतत वादविवाद सुरु असतात. हे चौघेही इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट वर्ल्डकपमध्येही दमदार कामगिरी करत आहेत. त्यातही न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसन आणि इंग्लंडचा रूट यांचे प्रदर्शन विशेष उल्लेखनीय आहे.

मात्र, रूटच्या संघातील इतर तीन (जॉस बटलर, जेसन रॉय, इयॉन मॉर्गन) फलंदाजांनी या स्पर्धेत शतके केली आहेत, त्यामुळे त्याच्यावर धावा करण्यासाठी तितकासा दबाव नाही. याउलट विल्यमसन हा न्यूझीलंडचा एकमेव फलंदाज आहे, ज्याने या स्पर्धेत शतकाची नोंद केली आहे. तसेच त्याने कर्णधार म्हणूनही उत्कृष्ट कामगिरी केली असून न्यूझीलंडचा संघ या वर्ल्डकपमध्ये अजूनही अपराजित आहे.

- Advertisement -

बुधवारी न्यूझीलंडचा सामना फॅफ डू प्लेसिसच्या दक्षिण आफ्रिकेशी झाला. या सामन्यापूर्वी द.आफ्रिकेने ५ पैकी ३ सामने गमावले होते. परंतु, या सामन्यात द.आफ्रिकेचा संघ वेगळ्या जिद्दीने खेळताना दिसला. त्यांनी प्रथम फलंदाजीत २४१ धावा केल्यानंतर न्यूझीलंडची ४ बाद ८० अशी अवस्था केली. मात्र, भरवशाच्या विल्यमसनने कागिसो रबाडा, लुंगी इंगिडी, इम्रान ताहिर यांचा न डगमगता सामना करत शतक झळकावले आणि किवीजना विजय मिळवून दिला. फटकेबाजी करणार्‍या, उत्तुंग षटकार लगवणार्‍या फलंदाजांची चलती असणार्‍या सध्याच्या काळात संयमी फलंदाजाचे महत्त्व विल्यमसनने पुन्हा एकदा दाखवून दिले.

कोहलीच्या भारतीय संघाने जिंकलेल्या २००८ सालच्या १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये विल्यमसनची जगाला ओळख झाली. त्यानंतर विल्यमसनने स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन केल्यामुळे २०१० साली त्याच्यासाठी न्यूझीलंड संघाची दारे खुली झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्या २-३ वर्षांत त्याला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. मात्र, त्याच्यातील प्रतिभा लक्षात घेऊन न्यूझीलंडच्या निवड समितीने त्याच्यावरचा विश्वास कायम ठेवला. त्यानेही हा विश्वास सार्थकी लावत २०१४ आणि २०१५ वर्षात मिळून कसोटीमध्ये ९ शतके, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४ शतके लगावली. न्यूझीलंडच्या घरच्या मैदानावर झालेल्या २०१५ वर्ल्डकपमध्ये त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली. विल्यमसनसारखा खमका फलंदाज संघात असल्याने मार्टिन गप्टिल आणि ब्रेंडन मॅक्युलम यांना आपला नैसर्गिक आक्रमक खेळ करता आला.

- Advertisement -

२०१६मध्ये मॅक्युलम निवृत्त झाल्यानंतर विल्यमसनवर न्यूझीलंड संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. कर्णधापदाच्या दबावामुळे त्याची फलंदाजी ढेपाळून न जाता अधिकच उत्कृष्ट झाली आहे. २८ वर्षाचा विल्यमसन हा मार्टिन क्रो, स्टिफन फ्लेमिंग, नेथन अ‍ॅस्टल, जॉन राईट, रॉस टेलर अशा फलंदाजांचा वारसा लाभलेल्या न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक कसोटी शतके (२०) लगवणारा फलंदाज आहे. तसेच तो सध्याच्या घडीला जगातील सर्वात तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखला जातो. फलंदाजाने चेंडू डोळ्याखाली कसा खेळावा हे विल्यमसनकडून शिकावे, असे अनेक क्रिकेट समीक्षक म्हणतात. त्याच्यासारखा फलंदाज संघात असल्यामुळेच न्यूझीलंडला हा वर्ल्डकप जिंकण्याचे दावेदार मानले जात आहे. त्यामुळे तो यापुढे कशी कामगिरी करतो यावर न्यूझीलंडच्या संघाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -