घरक्रीडाWimbledon : फेडररला पराभवाचा धक्का; हुर्काझने सरळ सेटमध्ये केले पराभूत

Wimbledon : फेडररला पराभवाचा धक्का; हुर्काझने सरळ सेटमध्ये केले पराभूत

Subscribe

विम्बल्डनमध्ये फेडररचा हा ११९ सामन्यांत केवळ १४ वा पराभव ठरला.

स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू आणि २० वेळच्या ग्रँड स्लॅम विजेत्या रॉजर फेडररचे विम्बल्डन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. उपांत्यपूर्व फेरीत आठ वेळच्या विम्बल्डन विजेत्या फेडररला पोलंडच्या हुबर्ट हुर्काझने सरळ सेटमध्ये पराभूत केले. ३९ वर्षीय फेडररची ही अखेरची विम्बल्डन स्पर्धा असू शकेल अशी चर्चा सुरु होती. त्यामुळे तो या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक होता. परंतु, त्याचे स्वप्न अधुरेच राहिले. ‘रॉजरने काही चुकीचे फटके मारले. अखेरचा सेट त्याने ०-६ असा गमावला. त्याला दुखापत असेल तरी तो सांगणार नाही. परंतु, आता आपण या महान खेळाडूला पुन्हा इथे (विम्बल्डनमध्ये) पाहू का, हे सांगणे अवघड आहे,’ असे महान टेनिसपटू बोरिस बेकर या सामन्यादरम्यान समालोचन करताना म्हणाले.

११९ सामन्यांत केवळ १४ वा पराभव 

पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात फेडररला पोलंडच्या हुबर्ट हुर्काझने ३-६, ६-७, ०-६ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. विम्बल्डनमध्ये फेडररचा हा ११९ सामन्यांत केवळ १४ वा पराभव ठरला. तसेच २००२ नंतर विम्बल्डनमधील सामना सरळ सेटमध्ये गमावण्याची ही त्याची पहिलीच वेळ ठरली. हुर्काझच्या दमदार खेळापुढे फेडररचा निभाव लागला नाही. ‘विम्बल्डनमध्ये रॉजरविरुद्ध खेळणे खूप खास होते. आज माझे स्वप्न पूर्ण झाले. रॉजरने इथे खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे,’ असे सामन्यानंतर हुर्काझ म्हणाला.

माटेयो बेरेटीनीची आगेकूच 

इटलीच्या माटेयो बेरेटीनीलाही स्पर्धेत आगेकूच करण्यात यश आले. सातव्या सीडेड इटलीच्या बेरेटीनीने उपांत्यपूर्व फेरीत १६ व्या सीडेड कॅनडाच्या फेलिक्स ऑगर-अलिआसिमेचा ६-३, ५-७, ७-५, ६-३ असा पराभव केला. बेरेटीनीचा उपांत्य फेरीत हुर्काझशी सामना होईल. तसेच उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात नोवाक जोकोविचसमोर कॅनडाच्या डेनिस शापोवालोव्हचे आव्हान असेल.
Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -