घरक्रीडाWimbledon : जोकोविचला खुणावतेय २० वे ग्रँड स्लॅम जेतेपद

Wimbledon : जोकोविचला खुणावतेय २० वे ग्रँड स्लॅम जेतेपद

Subscribe

जोकोविचला फेडरर आणि नदाल यांच्या २० ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे.

सर्बियाचा टेनिस स्टार नोवाक जोकोविचला रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या २० ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची रविवारी संधी मिळणार आहे. विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अव्वल सीडेड जोकोविचसमोर इटलीच्या सातव्या सीडेड इटलीच्या माटेओ बेरेटिनीचे आव्हान असणार आहे. बेरेटिनीचे आव्हान परतवून लावण्यात यश आल्यास जोकोविच सहाव्यांदा विम्बल्डनचे जेतेपद पटकावेल. टेनिस इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब मिळवण्यासाठी जोकोविच, फेडरर आणि नदाल यांच्यात स्पर्धा आहे.

यंदाचा मोसम सुरु होण्यापूर्वी फेडरर आणि नदाल यांच्या खात्यात २०-२० ग्रँड स्लॅम जेतेपदे होती. त्यामुळे या दोघांपैकी कोण पुढे जाणार याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु, जोकोविचने यावर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपन या दोन्ही स्पर्धा जिंकत आपले १९ वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले. त्यामुळे आता जोकोविचला यंदाचे सलग तिसरे ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकून फेडरर आणि नदाल यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे.

- Advertisement -

मागील वर्षी कोरोनामुळे विम्बल्डन स्पर्धा रद्द करावी लागली होती. त्याआधी मात्र जोकोविचनेच ही स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे यंदा विम्बल्डनचे जेतेपद आपल्याकडेच राखण्याचे जोकोविचचे लक्ष्य आहे. ३४ वर्षीय जोकोविचची विम्बल्डनच्या अंतिम फेरीत खेळण्याची ही सातवी वेळ असून त्याला केवळ एकदाच पराभव पत्करावा लागला आहे. यंदा त्याच्यासमोर बेरेटिनीचे आव्हान असणार आहे.

बेरेटिनी पहिल्यांदाच विम्बल्डनच्या अंतिम फेरीत खेळणार असून त्याला जोकोविचची हिरवळीवर (ग्रास कोर्ट) सलग २० विजयांची मालिका खंडित करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. यात त्याला यश येणार की, जोकोविच आपली विजयी घोडदौड सुरु ठेवत २० वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणार याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

- Advertisement -

विम्बल्डन जिंकणे माझ्यासाठी सर्वकाही – जोकोविच   

जोकोविचने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन नवव्यांदा, तर फ्रेंच ओपन दुसऱ्यांदा जिंकण्याची किमया साधली. परंतु, विम्बल्डनचे जेतेपद माझ्यासाठी सर्वकाही असेल, असे जोकोविच म्हणाला. विम्बल्डन जिंकणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मी ही स्पर्धा जिंकण्यासाठीच इथे आलो आहे. मला आता जेतेपदाची संधी आहे. परंतु, अंतिम सामन्यात काहीही होऊ शकते. माझ्या गाठीशी खूप अनुभव आहे आणि याचा मला फायदा होऊ शकेल, असे जोकोविचने नमूद केले. जोकोविचने उपांत्य फेरीत कॅनडाच्या डेनिस शापोवालोव्हचा सरळ सेटमध्ये पराभव केला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -