Wimbledon : ‘मी जगात सर्वोत्तम!’ विम्बल्डन विजेत्या जोकोविचचे वक्तव्य

जोकोविचने फेडरर आणि नदाल यांच्या सर्वाधिक २० ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

french government sports minister permission Novak Djokovic play in french open without corona vaccination

मी जगातील सर्वोत्तम टेनिसपटू आहे, असे सांगतानाच विम्बल्डन विजेत्या नोवाक जोकोविचने टेनिस इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू कोण, हे इतरांनी ठरवावे, असे उद्गार काढले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात अव्वल सीडेड जोकोविचने इटलीच्या माटेओ बेरेटिनीला ६-७ (४-७), ६-४, ६-४, ६-३ असे पराभूत करत सलग तिसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा विम्बल्डनचे जेतेपद पटकावले. तसेच या विजयासह जोकोविचने रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या सर्वाधिक २० ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी केली. आता या तिघांनाही सप्टेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकन ओपनमध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदांचा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी मिळेल.

खेळाडूंमध्ये तुलना करणे फार अवघड

मी स्वतःला जगातील सर्वोत्तम टेनिसपटू मानतो, अन्यथा मी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याबद्दल आणि ऐतिहासिक कामगिरी करण्याबद्दल इतक्या विश्वासाने बोलू शकलो नसतो. मात्र, मी टेनिस इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे की नाही, हे इतरांनी ठरवावे, असे जोकोविच म्हणाला. विविध पिढ्यांतील खेळाडूंमध्ये तुलना करणे फार अवघड आहे. पूर्वीच्या आणि आम्हाला उपलब्ध असलेल्या रॅकेट्स, चेंडू, तंत्रज्ञान, टेनिस कोर्टमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे ५० वर्षांपूर्वीच्या खेळाडूंची आताच्या खेळाडूंसोबत तुलना करणे फार अवघड आहे. मात्र, टेनिस इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंबाबत चर्चा करताना लोक माझे नाव घेतात याचा मला अभिमान आहे, असेही जोकोविचने नमूद केले.

जोकोविच एटीपी फायनल्ससाठी पात्र

जोकोविच यंदाच्या एटीपी फायनल्ससाठी पात्र ठरणारा पहिला टेनिसपटू ठरला आहे. मोसमाअंती होणाऱ्या या स्पर्धेत जोकोविच १४ व्यांदा खेळणार असून यंदा ही स्पर्धा जिंकण्यात यश आल्यास जोकोविच रॉजर फेडररच्या (६) सर्वाधिक एटीपी फायनल्स जेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी करेल. यंदा जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन या तिन्ही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.