Wimbledon : फेडररची नॉरीवर मात; तब्बल १८ व्यांदा विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत

चौथ्या फेरीत फेडररचा इटलीच्या लोरेंझो सोनेगोशी सामना होईल.

roger federer enters into fourth round
रॉजर फेडरर तब्बल १८ व्यांदा विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत

स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. आठ वेळच्या विम्बल्डन विजेत्या फेडररने ब्रिटनच्या कॅमरून नॉरीवर मात करत तब्बल १८ व्यांदा विम्बल्डनची चौथी फेरी गाठली. तसेच ग्रँड स्लॅम स्पर्धेची चौथी फेरी गाठण्याची ही त्याची ६९ वी वेळ ठरली. नॉरीविरुद्ध पुरुष एकेरीचा तिसऱ्या फेरीचा सामना फेडररने ६-४, ६-४, ५-७, ६-४ असा जिंकला. चौथ्या फेरीत फेडररचा इटलीच्या लोरेंझो सोनेगोशी सामना होईल. या सामन्याचा विजेता उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल.

फेडररचा सुरुवातीपासून चांगला खेळ

नॉरीविरुद्ध तिसऱ्या फेरीच्या सामन्यात फेडररने सुरुवातीपासून चांगला खेळ केला. त्याला पहिले दोन्ही सेट ६-४ आणि ६-४ असे जिंकण्यात यश आले. आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या नॉरीने तिसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन केले. त्याने हा सेट ७-५ असा जिंकला. परंतु, चौथ्या सेटमध्ये पुन्हा फेडररने आपला खेळ उंचावला आणि हा सेट ६-४ असा जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.

अँडी मरेचे आव्हान संपुष्टात  

ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरेचे विम्बल्डन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत कॅनडाच्या डेनिस शापोवालोव्हने मरेचा ६-४, ६-२, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. दोन वेळच्या विम्बल्डन विजेत्या मरेला मागील काही काळात दुखापतींनी सतावले आहे. त्यामुळे त्याला सातत्याने सामने खेळता आलेले नाही. विम्बल्डनमध्ये खेळण्याची यंदा त्याची २०१७ नंतर पहिलीच वेळ होती.