घरक्रीडाविजयाच्या हॅटट्रिकची संधी!

विजयाच्या हॅटट्रिकची संधी!

Subscribe

महिला वर्ल्डकप; भारत-न्यूझीलंड सामना आज

सलामीच्या सामन्यात गतविजेत्या आणि यजमान ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाने महिला टी-२० विश्वचषकातील दुसर्‍या सामन्यात बांगलादेशवर सहज मात केली. त्यामुळे गुरुवारी होणार्‍या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला विजयाच्या हॅटट्रिकची संधी आहे. तसेच भारताला हा सामना जिंकण्यात यश आल्यास ते उपांत्य फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकतील.

हरमनप्रीत कौरच्या संघाचे विश्वचषकाची झोकात सुरुवात करत आपण ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे. भारताने आपल्या पहिल्या दोन सामन्यांत ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यावर अनुक्रमे १७ आणि १८ धावांनी मात केली. त्यामुळे पाच संघांचा समावेश असलेल्या अ गटात भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. दोन्ही सामन्यांत भारताच्या फलंदाजांनी आणि खासकरून गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. १६ वर्षीय सलामीवीर शेफाली वर्माने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५ चेंडूत २९ धावांची खेळी करणार्‍या शेफालीने बांगलादेशच्या गोलंदाजांचीही चांगलीच धुलाई केली. तिने या सामन्यात १७ चेंडूतच २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ३९ धावा करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्सला (२६ आणि ३४) दोन्ही सामन्यांत चांगली सुरुवात मिळाली. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्याचा ती प्रयत्न करेल. या दोघींना दीप्ती शर्मा आणि वेदा कृष्णमूर्तीची उत्तम साथ लाभली आहे. कर्णधार हरमनप्रीत आणि उपकर्णधार स्मृती मानधनाला मात्र अजून आपली छाप पडता आलेली नाही. त्यामुळे या दोघींचे न्यूझीलंडविरुद्ध आपला फॉर्म सुधारण्याचे लक्ष्य असेल.

दुसरीकडे या विश्वचषकात सर्वाधिक विकेट मिळवणार्‍या गोलंदाजांच्या यादीत भारताची लेगस्पिनर पूनम यादव (२ सामन्यांत ७ बळी) अव्वल स्थानी, तर वेगवान गोलंदाज शिखा पांडे (२ सामन्यांत ५ बळी) दुसर्‍या स्थानी आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजांना या सामन्यात धावा करण्यासाठी झुंजावे लागू शकेल. भारत आणि न्यूझीलंड महिला संघांमध्ये झालेले मागील तिन्ही टी-२० सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. त्यातच त्यांनी या विश्वचषकातील आपल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले. त्यामुळे या सामन्यात त्यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, मागील विश्वचषकात झालेल्या दोन संघांतील सामन्यात भारताने बाजी मारली होती. हरमनप्रीतने या सामन्यात १०३ धावांची अप्रतिम खेळी केली होती. त्यामुळे भारतीय संघ या कामगिरीची पुनरावृत्ती करत विजयाची हॅटट्रिक करण्यास नक्कीच उत्सुक असेल.

- Advertisement -

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हर्लीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ति, रिचा घोष, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी.

न्यूझीलंड : सोफी डिव्हाईन (कर्णधार), रोझमेरी मेर, अमिलिया कर, सुझी बेट्स, लॉरेन डाऊन, मॅडी ग्रीन, हॉली हडल्स्टन, हेली जेन्सन, ली कॅस्परेक, जेस कर, केटी मार्टिन (यष्टीरक्षक), केटी पर्किन्स, अ‍ॅना पीटरसन, रेचल प्रिस्ट, लिह ताहूहू.

सामन्याची वेळ : सकाळी ९:३० पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -