IND vs AUS : म्हणून मी एकदिवसीय, टी-२० मालिकेला मुकणार; रोहितने केले स्पष्ट

रोहितला एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. 

rohit sharma
रोहित शर्मा

फिटनेसवर प्रश्नचिन्ह असल्याने उपकर्णधार रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. यंदा युएईत झालेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान रोहितच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी या तिन्ही मालिकांसाठी निवड झाली नव्हती. मात्र, तो कसोटी मालिकेपूर्वी पूर्णपणे फिट होण्याची शक्यता असल्याने त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

रोहितच्या दुखापतीबाबत बरीच चर्चा होत आहे. आता रोहितने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘लोक माझ्या फिटनेसबाबत आणि दुखापतीबाबत नक्की काय बोलत आहेत, हे मला ठाऊक नाही. परंतु, मी बीसीसीआय आणि मुंबई इंडियन्सशी सतत संपर्कात होतो. आता माझ्या पायाची दुखापत बरी होत आहे. मला कसोटी मालिका खेळण्यापूर्वी पूर्णपणे फिट व्हायचे होते. मला मनात शंका नको होती. त्यामुळे मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत न खेळता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एमसीए) सराव करण्याचा निर्णय घेतला,’ असे रोहितने सांगितले.

पायाच्या दुखापतीमुळे रोहित आयपीएल स्पर्धेतील काही सामन्यांना मुकला होता. मात्र, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. अंतिम सामन्यात दिल्लीने मुंबईपुढे सामना जिंकण्यासाठी १५७ धावांचे आव्हान ठेवले होते, जे मुंबईने ५ विकेट राखून पूर्ण केले. रोहितने ५१ चेंडूत ६८ धावांची खेळी करत मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.