घरक्रीडातेजिंदर, धावपटू जिन्सन प्राथमिक फेरीतच गारद

तेजिंदर, धावपटू जिन्सन प्राथमिक फेरीतच गारद

Subscribe

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

भारताचा गोळाफेकपटू तेजिंदर पाल तूर आणि १५०० मीटर धावपटू जिन्सन जॉन्सन यांचे जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आले. या दोघांनीही २०१८ साली जकार्ता येथे झालेल्या एशियाडमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.

२४ वर्षीय तेजिंदरने २०.४३ मीटर अशी आपली मोसमातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. मात्र, प्राथमिक फेरीच्या ‘ब’ गटात त्याला आठव्या, तर एकूण ३४ खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत १८ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. प्राथमिक फेरीतील ‘अ’ गटात आठही खेळाडूंनी २०.९० मीटरचे अंतर पार करत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच ‘ब’ गटातील तेजिंदरला अंतिम फेरी गाठणे अवघड होते.

- Advertisement -

त्याने आपल्या पहिल्या प्रयत्नात २०.४३ मीटर लांब गोळा फेकला. त्यानंतर ‘ब’ गटातीलच तीन खेळाडूंनी अंतिम फेरी गाठण्यासाठी आवश्यक अंतर पार केल्याने तेजिंदरवरील दबाव वाढला. तिसर्‍या प्रयत्नात त्याला २०.७५ मीटरची आपली सर्वोत्तम कामगिरी मागे टाकत २०.९० मीटरचे अंतर गाठणे आवश्यक होते. मात्र, त्याला केवळ १९.५५ मीटर लांब गोळाफेक करण्यात यश आले आणि तो अंतिम फेरीही गाठू शकला नाही.

दुसरीकडे १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत जिन्सन जॉन्सनला प्राथमिक फेरीत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्याने १५०० मीटर शर्यत पूर्ण करताना ३ मिनिटे ३९.८६ सेकंद अशी वेळ नोंदवली. त्यामुळे आपल्या हिटमध्ये तो दहाव्या, तर ४३ धावपटूंचा समावेश असलेल्या या शर्यतीत तो ३४ व्या स्थानावर राहिला. तीन हिटमधील अव्वल सहा धावपटूंनी आणि इतर सर्वात जलद धावपटूंनी या शर्यतीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -