घरक्रीडाजय विजय

जय विजय

Subscribe

विजय शंकरचे वर्ल्डकपमधील पदार्पण नाट्यपूर्ण ठरले. भुवनेश्वर कुमारला दुखापत झाल्यामुळे त्याचे षटक पूर्ण करण्यासाठी कर्णधार विराट कोहलीने विजय शंकरच्या हाती चेंडू सोपवला. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्डवरील ढगाळ वातावरणात गोलंदाजी करण्याची संधी आयती लाभल्यामुळे विजय शंकर खूष होता. पाकचा सलामीवीर इमाम-उल-हकला विजय शंकरने पहिल्याच चेंडूवर पायचीत पकडून भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला.

कर्णधार विराट कोहलीने आनंदाने उडी मारून आपल्या तामिळी सहकार्‍याला आलिंगन दिले. विराटची प्रसन्न मुद्राच सार काही सांगून जाणारी होती. वर्ल्डकपमध्ये पदार्पणातच पहिल्या चेंडूवर विकेट काढणार्‍या गोलंदाजांत विजय शंकरचे नाव घेतले जाईल. इयन हार्वे आणि मेलची जोन्स यांच्या पंगतीत आता विजय शंकरही सामील झाला आहे.

- Advertisement -

वर्ल्डकप चमूची घोषणा मुंबईत झाली तेव्हा विजय शंकरचे नाव बघून बर्‍याच जणांना आश्चर्याचा धक्का बसला. कोण हा विजय शंकर असा सवाल करण्यात आला. यात अनेक माजी कसोटीपटूंचाही समावेश होता. निवड समितीचे प्रमुख मनावा प्रसाद यांनाही टीकेला सामोरे जावे लागले. प्रसाद यांनी विजय शंकरच्या निवडीचे समर्थन करताना ती ’थ्री डायमेन्शनल’ खेळाडू असल्याचे नमूद केले. याचीच प्रचिती ओल्ड ट्रॅफोर्डवरील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आली. तेथील पावसाळी, ढगाळ वातावरणात विजय शंकरने अचूक गोलंदाजी करताना इमाम-उल-हक, तसेच पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद या दोघांची पॅव्हेलियनमध्ये रवानगी केली.

त्याच्या स्विंग, सीम गोलंदाजीने पाक फलंदाजांना जखडून टाकले. ५.२-०-२२-२ हे त्याचे गोलंदाजीचे पृथकरण पुरेसे बोलके आहे. भुवनेश्वर कुमारची उणीव त्याने भासू दिली नाही. तसेच कर्णधार विराट कोहलीचा विश्वासही सार्थ ठरवला. त्याआधी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने १५ चेंडूत १५ धावा केल्या. विजय शंकरमुळे भारताला अष्टपैलू खेळाडू निश्चितच गवसला आहे. विजय शंकरमुळे ज्याची वर्ल्डकप वारी हुकली, तो अंबाती रायडू आता थ्री डी गॉगल लावून वर्ल्डकपचे सामने बघत असावा.

- Advertisement -

वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला डकवर्थ-लुईस नियमानुसार ८९ धावांनी हरवले तेव्हा सोशल मीडियावर एक मेसेज फिरत होता. “पांड्या-राहुलवर बंदी; विजय शंकरला संधी, आयपीएलमध्ये रायडू अपयशी; विजय शंकर संघात, धवनला दुखापत; विजय शंकरला संघात स्थान, भुवनेश्वर कुमार जखमी; विजय शंकरला गोलंदाजी. नशीब हो तो विजय जैसा” असे यात म्हटले होते. विजय शंकरचे नाव सर्वतोमुखी झाले.

तामिळनाडूच्या या जिद्दी खेळाडूचे कौतुक करायला हवे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर वनडेत विजयने अष्टपैलू खेळाची छाप पाडून निवड समिती सदस्यांचे लक्ष वेधून घेतले. कर्णधार कोहलीबरोबर उपयुक्त भागीदारी करताना त्याने ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सामन्याच्या अखेरच्या षटकात कांगारूंच्या दोन विकेट्स काढून भारताचा विजय साकारला. तेव्हाच त्याने वर्ल्डकपचे तिकीट बुक केले. रणजी स्पर्धेतही गेल्या काही मोसमांमध्ये त्याची कामगिरी चांगली होत आहे. यंदा आयपीएलमध्ये मात्र त्याला सूर गवसला नाही.

तसेच वर्ल्डकपआधी झालेल्या सराव सामन्यातही त्याची कामगिरी खास नव्हती. जेमतेम ९ वनडे सामन्यांचा अनुभव असलेला विजय शंकर काय करणार अशी चर्चा सर्वत्र सुरु असताना त्याने पहिल्याच चेंडूवर इमाम-उल-हकची विकेट काढण्याचा पराक्रम केला. आपली भूमिका इमाने इतबारे पार पाडणार्‍या या तामिळी युवकाकडून भविष्यात निश्चितच उमेद बाळगता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -