घरक्रीडातीन तिगाडा, काम...

तीन तिगाडा, काम…

Subscribe

इंग्लंडमध्ये होत असलेला क्रिकेट वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी या स्पर्धेत फलंदाज आणि फिरकीपटू वर्चस्व गाजवतील असा अंदाज वर्तवला जात होता. इंग्लंडच्या संघाने मागील काही वर्षांत घरच्या मैदानावर अनेकदा ३००-३५० चा आकडा सहज पार केल्याने या वर्ल्डकपमध्ये धावांचा डोंगर उभारण्यात येईल, असे भाकीत केले जात होते. इंग्लंडमधील खेळपट्ट्या फलंदाजांना अनुकूल असल्याचे मागील काही वर्षांत पहायला मिळाले आहे.

मात्र, असे असतानाही यंदाच्या स्पर्धेत वेगवान गोलंदाज आपली छाप पाडताना दिसत आहेत. या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणार्‍या अव्वल दहा गोलंदाजांमध्ये एकही फिरकीपटू नाही. वेगवान गोलंदाजांच्या या दमदार कामगिरीमुळेच १-२ संघ वगळता सर्वच संघ किमान तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरताना दिसत आहेत आणि हे तीन गोलंदाज मिळून फलंदाजांच्या नाकीनऊ आणत आहेत. त्यामुळेच या वेगवान गोलंदाजांच्या त्रिकुटासाठी तीन तिगाडा, काम बिगाडा नव्हे, तर तीन तिगाडा, काम बनाया असे म्हणावे लागत आहे.

- Advertisement -

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट मिळवणार्‍या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क असून, त्याने ८ सामन्यांत २४ विकेट्स मिळवल्या आहेत. शनिवारी झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने ५ विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. तोच मागील (२०१५) वर्ल्डकपमधील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याला यंदाच्या स्पर्धेत पॅट कमिन्स आणि डावखुरा जेसन बेहरनडॉर्फ यांची चांगली साथ लाभली आहे. कमिन्सने आतापर्यंत ८ सामन्यांत १२, तर बेहरनडॉर्फने ३ सामन्यांतच ८ गडी बाद केले आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात बेहरनडॉर्फ (५ बळी) आणि स्टार्क (४ बळी) यांनी एकूण ९ विकेट्स घेत कांगारूंच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

ऑस्ट्रेलियाप्रमाणेच न्यूझीलंडचे तेज त्रिकूटही यंदाचा वर्ल्डकप गाजवत आहे. ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हेन्री यांच्या सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे न्यूझीलंडने अपेक्षेपेक्षाही चांगली कामगिरी केली आहे. सातत्याने १५० च्या वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या फर्ग्युसनने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याने ७ सामन्यांत १७ विकेट्स घेतल्या असून, तो या स्पर्धेतील दुसरा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. न्यूझीलंडचा मुख्य गोलंदाज ट्रेंट बोल्टला सुरुवातीच्या काही सामन्यात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मात्र, मागील ३ सामन्यांत ९ गडी बाद करत पुन्हा फॉर्मात आल्याचे त्याने दाखवून दिले आहे. या दोघांना मॅट हेन्रीचीही साथ लाभली आहे. त्याने आतापर्यंत ८ विकेट्स घेतल्याने अनुभवी टीम साऊथीला संघाबाहेर रहावे लागत आहे.

- Advertisement -

पाकिस्तानचा संघ सुरुवातीपासूनच वेगवान गोलंदाजांची खाण म्हणून ओळखला जातो. यंदाच्या वर्ल्डकपमध्येही हा संघ वेगवान गोलंदाजांवर अवलंबून असल्याचे पहायला मिळत आहे. खासकरून डावखुर्‍या मोहम्मद आमिरने ७ सामन्यांत १६ विकेट्स घेत पाकिस्तानसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याच्या बरोबरीनेच अनुभवी वहाब रियाझ (१० विकेट्स) आणि युवा शाहिन आफ्रिदी (१० विकेट्स) यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळेच पाकिस्तानला अजूनही उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे.

यजमान इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने आपल्या तेजतर्रार मार्‍याने फलंदाजांना चांगलेच अडचणीत टाकले आहे. वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी त्याला संघात घ्यायचे की नाही, याबाबत बराच वादविवाद झाला. मात्र, इंग्लंड निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवत डेविड विलीला संघाबाहेर ठेवले. आर्चरनेही त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थकी लावत (भारताविरुद्धच्या सामन्याआधी) ७ सामन्यांत १६ विकेट्स घेतल्या. या वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करणारा इंग्लंडचा तो एकमेव वेगवान गोलंदाज नाही. आपल्या वेगासाठी ओळखल्या जाणार्‍या मार्क वूडने आतापर्यंत १३ विकेट्स घेतल्या असून, सर्वाधिक विकेट घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत तो पाचव्या स्थानी आहे. त्यांना क्रिस वोक्सचीही साथ लाभली आहे. त्यामुळेच आगामी काळात हे गोलंदाज कशी कामगिरी करतात यावर त्यांच्या संघांची वर्ल्डकपमधील यापुढची वाटचाल अवलंबून असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -