घरक्रीडास्टार्कची ‘फाईव्ह’ स्टार कामगिरी

स्टार्कची ‘फाईव्ह’ स्टार कामगिरी

Subscribe

वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने घेतलेल्या ५ विकेट्स, तसेच अलेक्स कॅरी आणि उस्मान ख्वाजाच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या सामन्यात न्यूझीलंडचा ८६ धावांनी पराभव केला. हा ऑस्ट्रेलियाचा आठ सामन्यांतील सातवा विजय होता. त्यामुळे त्यांनी आपले गुणतक्त्यातील आपले अव्वल स्थान कायम राखले. पहिल्या ६ सामन्यांत अपराजित असणार्‍या न्यूझीलंडचा हा सलग दुसरा पराभव होता.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचे सलामीवीर डेविड वॉर्नर (८) आणि अ‍ॅरॉन फिंच (१६) हे झटपट माघारी परतले. स्टिव्ह स्मिथ (५), मार्कस स्टोइनिस (२१) आणि ग्लेन मॅक्सवेल (१) यांनाही चांगली फलंदाजी करण्यात अपयश आल्याने ऑस्ट्रेलियाची ५ बाद ९२ अशी अवस्था झाली. यानंतर उस्मान ख्वाजा आणि अ‍ॅलेक्स कॅरी यांनी १०७ धावांची भागीदारी केली. कॅरीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला करत ४७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, तर ख्वाजाने अर्धशतक करण्यासाठी ८० चेंडू घेतले.

- Advertisement -

मात्र, केन विल्यमसनच्या कामचलाऊ फिरकीने कॅरीला ७१ धावांवर माघारी पाठवले. ख्वाजाने चांगली फलंदाजी सुरू ठेवत ऑस्ट्रेलियाचे द्विशतक फलकावर लावले. ट्रेंट बोल्ट टाकत असलेल्या अखेरच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात ८८ धावांवर ख्वाजा बाद झाला. या पुढील २ चेंडूंवर बोल्टने स्टार्क आणि बेहरनडॉर्फ यांना माघारी पाठवत हॅटट्रिक पूर्ण केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत ९ बाद २४३ अशीच धावसंख्या उभारता आली.

२४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात अडखळती झाली. डावखुर्‍या बेहरनडॉर्फने न्यूझीलंडचे सलामीवीर हेन्री निकोल्स (८) आणि मार्टिन गप्टिल (२०) यांना माघारी पाठवले. मात्र, विल्यमसन आणि रॉस टेलर या भरवशाच्या फलंदाजांनी ५५ धावांची भागीदारी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. विल्यमसन मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच स्टार्कने त्याला ४० धावांवर बाद केले. टेलर षटकार लगावण्याच्या नादात ३० धावांवर बाद झाला. यानंतर स्टार्कच्या भेदक गोलंदाजीमुळे टॉम लेथम (१४) आणि मिचेल सँटनर (१२) या दोघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. न्यूझीलंडचा डाव ४४व्या षटकात १५७ धावांवर संपुष्टात आला.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत ९ बाद २४३ (उस्मान ख्वाजा ८८, अ‍ॅलेक्स कॅरी ७१; ट्रेंट बोल्ट ४/५१) विजयी वि. न्यूझीलंड : ४३.४ षटकांत सर्वबाद १५७ (केन विल्यमसन ४०, रॉस टेलर ३०; मिचेल स्टार्क ५/२६).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -