हार गये पर मान गये!

बांगलादेश

मागील एका दशकातील सर्वात झपाट्याने प्रगती केलेला क्रिकेट संघ कोणता, असा प्रश्न विचारला असता बांगलादेशचे नाव घेतले जाते. १९९९ मध्ये आपला पहिला वर्ल्डकप खेळलेल्या या आशियाई संघाची मागील काही वर्षांतील कामगिरी फारच उल्लेखनीय आहे. २००७ च्या वर्ल्डकपमध्ये त्यांनी भारताचा पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला, तर मागील वर्ल्डकपमध्ये (२०१५) त्यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची किमया केली. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये मात्र त्यांना बाद फेरीत प्रवेश करता आला नाही. या वर्ल्डकपमध्ये सर्वोत्तम १० संघांचाच समावेेश असल्याने बांगलादेश या स्पर्धेत आगेकूच करणार नाही हे अपेक्षितच होते. परंतु, मश्रफी मुर्तझाच्या या संघाने आपल्या झुंजार खेळाने सर्वांनाच प्रभावित केले.

यंदाच्या स्पर्धेची बांगलादेशने विजयी सुरुवात केली. त्यांनी पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३३० ची धावसंख्या उभारली. अष्टपैलू शाकिब अल हसन आणि मुशफिकूर रहीम या अनुभवी जोडीने १४२ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. त्यानंतर डावखुर्‍या मुस्तफिझूर रहमानच्या भेदक गोलंदाजीमुळे आफ्रिकेचा डाव ३०९ धावांवर आटोपला आणि बांगला टायगर्सनी हा सामना जिंकला. मात्र, यानंतरचा विजय मिळवण्यासाठी त्यांना ३ सामने वाट पहावी लागली. त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध या स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला.

या सामन्यात विंडीजने प्रथम फलंदाजी करताना ३२१ धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे बांगलादेशला दुसरा विजय मिळवण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार असे वाटले होते, पण शाकिबच्या शतकाच्या जोरावर त्यांनी ३२२ धावांचे आव्हान अवघ्या ४१.३ षटकांत पूर्ण केले. यानंतर त्यांनी अपेक्षेनुसार अफगाणिस्तानचाही पराभव केला. यादरम्यान त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि भारताला चांगलेच झुंजवले, पण अखेर त्यांनी काही चुका केल्यामुळे त्यांचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बांगलादेशने ३३३ धावांपर्यंत मजल मारली. ही त्यांची वर्ल्डकपमधील सर्वोच्च धावसंख्या. त्यामुळे ते पराभूत झाले तरी त्यांनी आपल्या खेळामुळे चाहत्यांची मने जिंकली.

बांगलादेशच्या या कामगिरीत सर्वात मोलाचे योगदान अष्टपैलू शाकिब अल हसन आणि वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान यांनी दिले आहे. जगातील सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ओळखल्या जाणार्‍या शाकिबने या स्पर्धेच्या ८ सामन्यांत २ शतके आणि ५ अर्धशतकांच्या मदतीने ६०६ धावा फटकावल्या. त्यामुळे तो या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी विराजमान झाला. तसेच त्याने गोलंदाजीतही आपली चमक दाखवत ११ विकेट्स मिळवल्या. त्याला या स्पर्धेत मुस्तफिझूरची उत्कृष्ट साथ लाभली. मुस्तफिझूरने या स्पर्धेत २० गडी बाद करण्याची कौतुकास्पद कामगिरी केली.

आता या संघाच्या बर्‍याच अनुभवी खेळाडूंनी तिशी ओलांडली आहे. त्यामुळे ते पुढील वर्ल्डकपमध्ये खेळणार हे निश्चित नाही. परंतु, ज्या खेळाडूंचा हा अखेरचा वर्ल्डकप होता, ते आपल्या संघाच्या कामगिरीबाबत नक्कीच संतुष्ट असतील.