दोन निकराच्या झुंजी

जसप्रीत बुमराह

वर्ल्डकपमधील कंटाळवाण्या, नीरस, एकतर्फी लढतींना नाट्यपूर्ण कलाटणी मिळाली ती शनिवारच्या भारत-आफगाणिस्तान, न्यूझीलंड-वेस्टइंडिज या दोन लढतींमुळे. मँचेस्टर ओल्ड ट्रॅफडवरील लढतीत गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंडने विंडीजवर ५ धावांनी विजय संपादला. जसप्रीत बुमराह तसेच हॅट्ट्रिक बहादर मोहम्मद शमीच्या करामतीमुळे साऊदम्प्टॅनवर भारताने तळाच्या अफगाणिस्तानवर ११ धावांनी मात केली. शनिवारचा दिवस सनसनाटी ठरला. दोन्ही नाट्यपूर्ण लढती अखेरच्या षटकापर्यंत विलक्षण रंगल्या.

साऊदम्प्टॅनच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टी मुजीब उर रहमान, मोहम्मद नबी, राशिद खान या अफगाणी फिरकी त्रिकुटाने भारताला २२४ धावांवर रोखले. विराट कोहलीने कर्णधाराला साजेशी ६७ धावांची खेळी करताना लोकेश राहुल, विजय शंकर यांच्या साथीने उपयुक्त भागीदार्‍या रचल्या. टिचून अचूक मारा हे नबीचे वैशिष्ठ्य, वनडेत धावा रोखण्याचे काम तो चोखपणे करतो. त्याचा फायदा राशिद आणि मुजीब यांना होतो. मुजीबने फॉर्मात असलेल्या रोहित शर्माचा त्रिफळा उडवला, तर राशिदच्या फिरकीने धोनीसारख्या अनुभवी फलंदाजाला पुढे खेचत यष्टीचीत केले!

२२५ धावांच्या भारतीय आव्हानाचा अफगाणी फलंदाजांनी नेटाने मुकाबला केला. बुमराहच्या घातक गोलंदाजीने रहमत, शाहिदी यांना एकाच षटकात गारद करून अफगाणिस्तानचा प्रतिकार मोडून काढला. नबीने मात्र जिगरबाज खेळ करत तळाच्या फलंदाजांच्या साथीने निकराची झुंज देत अफगाणिस्तानचे द्विशतक फलकावर झळकावले. कर्णधार विराट कोहलीने बुमराहचा कल्पकतेने वापर करत त्याला ४७ व ४९व्या षटकासाठी चेंडू दिला. बुमराहने आपला सारा अनुभव पणाला लावत अफगाणी फलंदाजांची नाकेबंदी केली. ५० व्या व अखेरच्या षटकात विजयासाठी १६ धावा फटकावण्याचे कठीण आव्हान नबी आणि सहकार्‍यांसमोर होते.

दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमार ऐवजी संघात आलेल्या शमीने नबीला लाँगऑनवरील हार्दिक पांड्याकरवी झेलबाद केले. शमीच्या पहिल्याच चेंडूवर नबीने चौकार मारला. पुन्हा एकदा उंचावरून फटका लगावण्याच्या नादात नबी झेलबाद झाला. शमीने पुढच्या दोन चेंडूवर अफताब आलम, मुजीब उर रहमान यांचे त्रिफळे उडवून हॅट्ट्रिक साजरी केली. यंदाच्या वर्ल्डकपमधील ही पहिलीच हॅट्ट्रिक, तसेच एकंदर वर्ल्डकपमधील दहावी.

वर्ल्डकपमधील पहिलीवहिली हॅट्ट्रिक नोंदवण्याचा मान भारताच्या चेतन शर्माला मिळाला होता. १९८७ वर्ल्डकपमध्ये नागपूरच्या (जुना) व्हीसीए स्टेडियमवर चेतन शर्माने न्यूझीलंडच्या केन रदरफर्ड, इयन स्मिथ व इवन चॅटफिल्ड यांचे त्रिफळे उडवून हॅट्ट्रिक साधली होती. श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने वर्ल्डकपमध्ये दोनदा हॅट्ट्रिकची किमया साधली आहे. २००७ च्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुध्द तर २०११ मध्ये केनियाविरुध्द मलिंगाने हा पराक्रम केला होता. साकलेन मुश्ताक, चमिंड वास, ब्रेट ली, किमार रोच, स्टीव फिन, डयुमिनी यांनीदेखील वर्ल्डकप स्पर्धेत हॅट्ट्रिक नोंदवली आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम १४८ धावांची खणखणीत खेळी पेश करताना एक षटकार, १४ चौकार लगावले. त्याने रॉस टेलरबरोबर तिसर्‍या विकेटसाठी १६० धावांची भागी केली. न्यूझीलंडने ५० षटकांत २९१ ची मजल मारली. विल्यमसनचे वर्ल्डकपमधील हे लागोपाठ दुसरे शतक. तोच सामन्यात सर्वोत्तम ठरला. कार्लोस ब्रेथवेटच्या झुंजार फटकेबाज शतकानंतरही विंडीजला सामना गमवावा लागला. किवीजच्या २९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची हालत २७ षटकांत ७ बाद १६४ अशी झाली होती. मात्र, उंचपुर्‍या ब्रेथवेटने तडाखेबंद फटकेबाजी करून ८२ चेंडूत ९ चौकार, ५ षटकारांनिशी १०१ धावा तडकावल्या. तळाच्या सहकार्‍यांच्या साथीने त्याने १२२ धावांची भर घातली. न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर त्याने जोरदार प्रतिहल्ला चढवला.

निशमला विजयी षटकार फटकावण्याच्या नादात ब्रेथवेटचा झेल ट्रेंट बोल्टने सुरेख पकडला. बोल्टने ३० धावात ४ मोहरे टिपून विंडीजच्या डावाला खिंडार पाडले. सलामीवीर क्रिस गेलने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत ८४ चेंडूत ८७ धावा चोपून काढल्या. ६ षटकार, ८ चौकार हे त्याचे प्रमुख फटके. हेटमायरने गेलला साथ देताना शतकी भागीदारी रचली, त्यात त्याचा वाटा ५४ धावांचा. न्यूझीलंडच्या फर्ग्युसनने ३ मोहरे टिपताना बोल्टला सुरेख साथ दिली. ब्रेथवेटचे पहिलेवहिले शतक विंडीजला विजयी करू शकले नाही याची चुटपुट ओल्ड ट्रॅफर्डवरील विंडीजच्या चाहत्यांना लागली. तसेच रात्री उशिरापर्यंत टेलिव्हिजनवर सामना पाहणारे रसिकही विंडीजचा विजय हुकल्यामुळे हळहळले.