बेरीज कमी, वजाबाकी जादा

Virat Kohli
भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली

बाराव्या वर्ल्डकप स्पर्धेत यंदा नवा विजेता ठरेल. ऑस्ट्रेलियाचे जेतेपद आपल्याकडेच राखण्याचे मनसुबे इंग्लंडने उधळून लावले. साखळीत अव्वल स्थान पटकावणार्‍या भारताचे जेतेपदाचे स्वप्न भंगले ते उपांत्य फेरीतील न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे. न्यूझीलंडने भारताला हरवून लागोपाठ दुसर्‍यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. वर्ल्डकपमध्ये १० पैकी ५ संघ आशियाई, पण अंतिम फेरीत मात्र एकही आशियाई संघ नाही. गेल्या वर्ल्डकपचीच पुनरावृत्ती यंदा इंग्लंडमध्ये झाली. तेराव्या वर्ल्डकपचे यजमानपद भारताला लाभले असून २०२३ मध्ये होणार्‍या वर्ल्डकप स्पर्धेत चित्र बदलेल अशी आशा करूया.

विराट कोहलीच्या भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. साखळी लढतीत इंग्लंडकडून पराभव पत्करणार्‍या भारतीय संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडचे २४० धावांचे आव्हान पेलवले नाही. साखळी सामन्यांत धावांच्या राशी उभारणार्‍या रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली हे एकसाथ अपयशी ठरल्यामुळे (तिघांच्या मिळून तीन धावा), तसेच मधल्या फळीचे सातत्यपूर्ण अपयश भारताला भोवले. ३८ वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज धोनीच्या कामगिरीबाबत बरीच चर्चा झाली. त्याच्या निवृत्तीबाबतच्या बातम्या ’पसरवण्यात’ आल्या. धोनीच्या मंदावलेल्या स्ट्राईक-रेटवरून वादंग माजले. उपांत्य झुंजीत जाडेजा, धोनीच्या शतकी भागीदारीमुळे भारताने न्यूझीलंडला झुंज दिली. मात्र, ते पराभव टाळू शकले नाहीत.

अ‍ॅरॉन फिंचच्या ऑस्ट्रेलियन संघाला अ‍ॅशेस मालिकेआधीच धक्का बसला. कमालीच्या एकतर्फी लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पराभूत होण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. ११ वर्ल्डकप स्पर्धांमध्ये ५ वेळा जेतेपद आणि दोनदा उपविजेतेपद पटकावणार्‍या ऑस्ट्रेलियाला यंदा मात्र आपला ठसा उमटवता आला नाही. डेविड वॉर्नर, मिचेल स्टार्क यांनी आपली कामगिरी चोख बजावली, पण उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध त्यांचे अपयश ऑस्ट्रेलियाला महागात पडले. माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथने या सामन्यात एकाकी झुंज दिली. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्याविरुद्धच्या साखळी सामन्यांतील पराभवाचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाची कामगिरी टिक होती. वॉर्नर, फिंच, कॅरी यांनी फलंदाजीत तर स्टार्क, कमिन्स, बेहरनडॉर्फ यांनी गोलंदाजीत आपली कामगिरी पार पाडली. मधल्या फळीनेच ऑस्ट्रेलियाला दगा दिला.

पाकिस्तानच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला. सलामीच्या सामन्यात विंडीजकडून झालेला दारुण पराभव, त्यातच पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताकडून वर्ल्डकपमधील पराभवांची अखंडित मालिका यामुळे पाकचे पाठीराखे संतापले नसते तर नवलंच! इंग्लंडवर पाकने संस्मरणीय विजय मिळवला तो सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे. परंतु नंतर मात्र त्यांच्या कामगिरीला ग्रहण लागले. परिणामी साखळीतच गारद होण्याची आपत्ती त्यांच्यावर ओढवली.

माजी विजेत्या श्रीलंकेने यंदाच्या स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली. त्यांची फलंदाजी बहरलीच नाही, तर गोलंदाजीतही दम नव्हता. मलिंगाने शर्थीचे प्रयत्न केले, पण त्याला इतरांची साथ लाभली नाही. कर्णधार दिमुथ करुणरत्ने, माजी कर्णधार मॅथ्यूज यांच्या एखाद-दुसर्‍या झुंजी वगळता त्यांची फलंदाजी कोलमडली. साखळी लढतीत श्रीलंकेने इंग्लंडवर मिळवलेल्या विजयामुळे स्पर्धेत रंगत निर्माण झाली इतकेच.

दक्षिण आफ्रिकेने पुरती निराशा केली. खेळाडूंच्या दुखापतींनी त्यांना ग्रासले होते. खराब सुरुवातीनंतर त्यांचा संघ सावरलाच नाही. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणातील ढिलाई त्यांना नडली. ऑस्ट्रेलियावरील विजय त्यांची या स्पर्धेतील लक्षवेधी कामगिरी. बांगलादेशने काही चांगले विजय मिळवले. शाकिब अल हसनने अष्टपैलू कामगिरी करून आपला ठसा उमटवला, पण सांघिक कामगिरीत अपयश. या अपयशामुळे बांगलादेशला फारशी प्रगती करता आली नाही. माजी विजेत्या विंडीजने भ्रम निरास केला.