घरक्रीडाझोपी गेलेला जागा झाला

झोपी गेलेला जागा झाला

Subscribe

न्यूझीलंडची वर्ल्डकपमधील विजयी मालिका खंडित केली ती सर्फराज अहमदच्या पाकिस्तानने. बाबर आझमच्या खणखणीत शतकामुळे पाकिस्तानने दोन गुण मिळवून वर्ल्डकपमधील आपले आव्हान कायम ठेवले आहे. शाहिन आफ्रिदीच्या तेजतर्रार मार्‍यापुढे न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पडले. निम्मा संघ ८२ धावांत गारद झाल्यावर न्यूझीलंडने द्विशतकी मजल मारली ती निशम, डी ग्रॅडहोम यांच्या शतकी भागीदारीमुळे. पाकचा यष्टिरक्षक-कर्णधार सर्फराजने सूर मारुन टेलरचा सुरेख एकहाती झेल टिपला. किवीजच्या तुलनेत पाकने फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणात कसूर केली नाही. ओल्ड ट्रॅफर्डवरील पाकचे चाहते, माजी कसोटीवीर खुशीत होते. न्यूझीलंडवरील विजयामुळे पाक संघाची उमेद वाढली असून तळाचा अफगाणिस्तान (लीड्स २९ जून), तसेच गुणतक्त्यात एक स्थान वर असलेल्या बांगलादेशाकडून पाकला कडव्या संघर्षाची अपेक्षा आहे.

फजल महमूद, खान महमद, आसीफ मसूद, इम्रान खान, सर्फराज नवाझ, सिकंदर बख्त, वसीम अक्रम, वकार युनुस, शोएब अख्तर असा तेज गोलंदाजांचा वारसा मोहम्मद आमिर, शाहिन आफ्रिदी यांना लाभला आहे. तेज गोलंदाजांची पाकिस्तानची परंपरा आहे. मोहम्मद आमिरचा पाक संघात समावेश अखेरच्या क्षणी करण्यात आला. पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्तक्षेपामुळे आमिरची पाक संघात वर्णी लागली. आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवणार्‍या आमिरने ७ सामन्यांत १६ मोहरे टिपले असून मिचेल स्टार्क पाठोपाठ (१९ बळी) सर्वाधिक मोहरे टिपणार्‍या गोलंदाजांत दुसरा क्रमांकावर आहे .न्यूझीलंड सलामीवीर मार्टिन गप्टिलचा आमिरने त्रिफळा उडवल्यावर दुसर्‍या एंडकडून शाहिन आफ्रिदीने एकापाठोपाठ एक धक्के देत १३ षटकांत न्यूझीलंडची ४ बाद ४६ अशी दयनीय अवस्था केली.

- Advertisement -

गोलंदाजांच्या कामगिरीवर कळस वढवला तो फलंदाजांनी. अनुभवी मोहम्मद हाफिजने शतकवीर बाबर आझमच्या साथीने पाकचा डाव सावरला. एजबॅस्टनच्या खेळपट्टीवर न्यूझीलंडला फिरकी गोलंदाजांची उणीव प्रकर्षाने जाणवली. सँटनरला साथ देण्यासाठी कर्णधार विल्यमसनला कामचलाऊ फिरकीचा आधार घ्यावा लागला. कर्णधाराने ८ षटके टाकली आणि हाफिजसारखा मोहरा टिपला. ईश सोधीला वगळण्याचा निर्णय किविजना महागात पडला. बाबर आझमने फ्लिक, ड्राइव्ह, कटचे फटके लगावत शतक साजरे केले. त्याचा बचावही भक्कम आहे. तंत्रशुध्द फलंदाजांत त्याची गणना करावी लागेल. ३८ धावांवर यष्टिरक्षक लॅथमकडून मिळालेल्या जीवदानाचा पुरेपुर फायदा उठवत बाबरने शतक साजरे करुन पाकचा विजय साकारला.

वनडेतील ३००० धावांचा टप्पा त्याने झटपट (६८ डावांत) पार केला. हॅरिस सोहेलने बाबरला छान साथ देताना अर्धशतक झळकावले. या दोन युवा खेळाडूंमुळे पाकचा मधल्या फळीला स्थैर्य लाभले आहे.

- Advertisement -

भारताविरुध्द मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागल्यावर पाकिस्तानात तीव्र प्रतिक्रिया उमटली. चाहत्यांचा रोष, प्रसारमाध्यमांकडून (माजी खेळाडूंची टिका-टिप्पणी) खरडपट्टी यामुळे पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर वैतागले. “भारताविरुध्दच्या पराभवानंतर मला आत्महत्या करावीशी वाटली”,असे उद्गार आर्थर यांनी काढले. द.आफ्रिका, न्यूझीलंडवरील विजयामुळे मात्र पाकिस्तानला बाद फेरीतील प्रवेशाची स्वप्ने पडू लागली आहेत. १९९२ मध्ये अ‍ॅास्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील वर्ल्डकप स्पर्धेतही इम्रान खानच्या पाक संघाची सुरुवात अशीच डळमळीत झाली होती. परंतु, नंतर त्यांनी खेळ उंचावत जेतेपद पटकावण्याची किमया साधली. यंदाच्या वर्ल्डकपमध्येही विंडीजने खुर्दा उडवल्यावर यजमान इंग्लंडला पाकने हरवले, पण भारत तसेच ऑस्ट्रेलियाकडून मार खाणार्‍या पाकिस्तानने द.आफ्रिका, न्यूझीलंडला हरवून आपल्या आशा कायम राखल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -