घरक्रीडाशिखरवर विश्वास की इतरांवर अविश्वास?

शिखरवर विश्वास की इतरांवर अविश्वास?

Subscribe

विराट कोहलीच्या टीम इंडियाने इंग्लंडमधील क्रिकेट वर्ल्डकपची २ सामने जिंकत दमदार सुरुवात केली. भारताचे हे विजय दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांविरुद्ध आले. मात्र, भारतीय संघात आनंदी वातावरण असतानाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी करणारा सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याचे वृत्त समोर आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला चेंडू लागला. सुरुवातीला ही दुखापत फारशी गंभीर वाटली नव्हती, मात्र या सामन्यानंतर वैद्यकीय तपासणी झाल्यावर त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर असल्याचे कळले. या दुखापतीमुळे त्याला उर्वरित वर्ल्डकपला मुकावे लागेल अशी शक्यता वर्तवली जात होती.

परंतु, संघ व्यवस्थापनाने त्याला मायदेशी न पाठवता डॉक्टरांच्या देखरेखी संघासोबतच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तो नक्की किती दिवसांत फिट होणार हे सांगता येणे अवघड आहे. मग असे असताना शिखर लवकर फिट होईल असा संघ व्यवस्थापनाला विश्वास असल्याने त्याला संघासोबत ठेवले की युवा रिषभ पंत, श्रेयस अय्यर यासारख्या खेळाडूंच्या इंग्लंडमध्ये चांगले प्रदर्शन करण्याच्या क्षमतेवर विश्वास नसल्याने शिखराला संघासोबत ठेवले, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

- Advertisement -

शिखर आणि रोहित शर्मा हे सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम सलामीवीर म्हणून ओळखले जातात. २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीपासून एकत्र आलेल्या या जोडीने आतापर्यंत १०३ सामन्यांत ४५.८९ च्या सरासरीने ४६८१ धावा केल्या आहेत. त्यामुळे शिखर अजून वर्ल्डकपमधून बाहेर गेलेला नाही, ही भारतासाठी आनंदाची गोष्ट आहे. मात्र, त्याला यापुढील किमान ३ सामन्यांत खेळता येणार नाही हे निश्चित आहे. भारताचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर बुधवारी शिखरच्या दुखापतीबाबत म्हणाले की, ’शिखरबाबतचा अंतिम निर्णय आम्ही १०-१२ दिवसांनंतरच घेऊ शकतो.

दुखापत झाली म्हणून त्याच्यासारख्या महत्त्वाच्या खेळाडूला घाई करून आम्ही संघातून बाहेर काढू शकत नाही.’ मग जर संघाला शिखर लवकर फिट होईल हा विश्वास नसेल, तर त्याला संघात ठेवणे योग्य आहे का? शिखर नसल्याने लोकेश राहुलला पुढील काही सामन्यांत सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळेल. सलामीवीर म्हणून राहुलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६७.२५च्या सरासरीने २६९ धावा केल्या असल्या तरी त्याच्या स्विंग आणि सीम गोलंदाजीविरुद्धच्या तंत्राबाबत अजूनही प्रश्न आहेत. तसेच सराव सामन्यात आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याने चांगले प्रदर्शन केले होते. त्यामुळे अजिंक्य रहाणे किंवा मयांक अगरवाल या सलामीवीरांना संघात घेऊन राहुलला चौथ्या क्रमांकावरच ठेवणे कदाचित उचित राहिले असते.

- Advertisement -

राहुल सलामीवीर म्हणून खेळला तर विजय शंकर किंवा दिनेश कार्तिक यांच्यापैकी एकाला मधल्या फळीत संधी मिळू शकेल. वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा करताना निवड समितीचे अध्यक्ष प्रसाद म्हणाले होते की चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी शंकरला आमची पसंती आहे. मात्र, अष्टपैलू असूनदेखील पहिल्या २ सामन्यांत त्याला संधी मिळाली नाही, यावरुनच संघ व्यवस्थापनाला त्याच्यावर किती विश्वास आहे हे कळते. आता त्याला किंवा कार्तिकला या सामन्यांत चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आल्यास शिखरऐवजी पंत, रायडू किंवा श्रेयस अय्यर या फलंदाजांपैकी एकावर विश्वास दाखवला असता तर बरे झाले असते, असे संघ व्यवस्थापनाला वाटू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -