राहुल दुसर्‍या स्थानी कायम, कर्णधार कोहलीची घसरण!

 जागतिक टी-२० क्रमवारी

भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने या मालिकेच्या ५ सामन्यांत २ अर्धशतकांच्या मदतीने २२४ धावा फटकावत मालिकावीराचा पुरस्कार मिळवला होता. याचा त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत फायदा झाला आहे. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीनुसार राहुलने टी-२० क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीची मात्र दहाव्या स्थानी घसरण झाली आहे.

सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोहलीला मागील काही काळात टी-२० क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या ४ सामन्यांत त्याला केवळ १०५ धावाच करता आल्या. तर मागील सात सामन्यांत त्याला अर्धशतक करता आलेले नाही. त्यामुळे त्याची फलंदाजांच्या यादीत दहाव्या स्थानी घसरण झाली आहे. त्याच्या खात्यात सध्या ६७३ गुण आहेत. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-२० सामन्यांत ६८ च्या सरासरीने सर्वाधिक १३६ धावा केल्या. यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. त्यामुळे त्याने कोहलीला मागे टाकत नवव्या स्थानी झेप घेतली. त्याचे ६८७ गुण आहेत.

फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम अव्वल स्थानी असून त्याच्या खात्यात ८७९ गुण आहेत. तर दुसर्‍या स्थानावरील राहुलचे ८२३ गुण आहेत. राहुलने मागील १२ टी-२० सामन्यांत सहा अर्धशतके लगावली असून दोन वेळा ४५ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याने भारतीय संघातील आपले स्थान पक्के केले आहे. त्याचा सलामीचा साथी रोहित शर्मा अकराव्या स्थानावर कायम आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी कॉकला दहा स्थानांची बढती मिळाली असून तो १६ व्या स्थानी पोहोचला आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांत ३१, ६५ आणि ३५ धावा केल्या. तर त्याचा सहकारी टेंबा बवुमाला तब्बल १२३ स्थानांची बढती मिळाली आहे.

गोलंदाजांत बुमराह १२ व्या स्थानावर!
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने नुकतेच आपले एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल स्थान गमावले. टी-२० क्रिकेटमध्ये मात्र तो १२ व्या स्थानावर कायम आहे. त्याचे आणि वेस्ट इंडिजच्या शेल्डन कॉट्रेलचे ६३० गुण आहेत. बुमराहला न्यूझीलंडविरुद्ध ५ सामन्यांत केवळ ६ विकेट मिळवता आल्या. भारताचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल ३० व्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेचा चायनामन फिरकीपटू तबरेझ शम्सीला नऊ स्थानांची बढती मिळाली असून तो आठव्या स्थानी पोहोचला आहे. त्याचे ६५४ गुण आहेत.