घरक्रीडाकर्दनकाळ बुमराह

कर्दनकाळ बुमराह

Subscribe

भारतीय संघाने विंडीजवर २-० असा विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत १२० गुणांसह अव्वल स्थान पटकावले. विंडीज फलंदाजीचे कंबरडे मोडण्यात जसप्रीत बुमराहने मोलाची भूमिका बजावली. दोन कसोटीत १३ बळी ही बुमराहची कामगिरी उत्साहवर्धक. अँटिगा कसोटीत ७ धावांत ५ बळी गारद करताना त्याने कॅम्पबेल, ब्रावो, होप, होल्डर यांचे त्रिफळे उडवले. ही कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय तेज गोलंदाज आहे. कमीत-कमी धावात (किमान) जास्तीत-जास्त बळी (कमाल) ही त्याची कामगिरी भारतासाठी सर्वोत्तम. (वेंकटपथी राजू, रविंद्र जाडेजा, हरभजन, सुभाष गुप्ते, जवगल श्रीनाथ यांनीही किमान धावात कमाल बळी मिळवण्याची किमया केली पण बुमराहच या सर्वांमध्ये उजवा ठरला)

विराट कोहलीच्या भारतीय संघाने जेसन होल्डरच्या विंडीजवर २-० असा विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत १२० गुणांसह अव्वल स्थान पटकावले. भारतीय संघाने अपेक्षेनुसार कामगिरी केली असून या विजयाचे श्रेय जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या तेज त्रिकुटाला द्यावे लागेल. ४० पैकी ३३ बळी या तिघांनी मिळवून प्रतिस्पर्ध्यांना गारद केले. त्यातही सिंहाचा वाटा उचलला तो गुजरातच्या उंचपुर्‍या पंजाबी युवकाने, जसप्रीत बुमराहने! अँटिगा येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ८-४-७-५ असा भन्नाट स्पेल टाकणार्‍या बुमराहने किंगस्टन, जमैकाच्या दुसर्‍या कसोटीत हॅटट्रिकसह ६ मोहरे टिपले ते २७ धावात. विंडीज फलंदाजीचे कंबरडे मोडण्यात बुमराहने मोलाची भूमिका बजावली. ईशांत आणि शमीची तोलामोलाची साथ बुमराहला लाभली, त्यामुळे कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. शतकवीर, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, तसेच नवोदित हनुमा विहारी यांचेही योगदान विसरून चालणार नाही.

गेल्या दीड-दोन वर्षांत परदेश दौर्‍यात भारतीय गोलंदाजीला खासकरून तेज गोलंदाजीला विलक्षण धार आली आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज या चार दौर्‍यात भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांना दोनदा गारद करण्याची किमया केली त्याचा प्रमुख नायक सरदार जसप्रीत बुमराह. अहमदाबादमध्ये मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या बुमराहला आवड गुजराती खमण ढोकळ्याची! काहीशी विचित्र गोलंदाजीची शैली असणार्‍या बुमराहचे प्रमुख अस्त्र यॉर्कर. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक जॉन राईट यांनी गुजरातच्या या गुणी गोलंदाजाची गुणवत्ता हेरली. न्यूझीलंडच्या या शांत वृत्तीच्या मितभाषी माजी कर्णधाराची गुणग्राहकता वाखाण्याजोगी. बीकेसीत २००७-०८ च्या मोसमात एमसीएच्या क्रिकेट संकुलात विजय हजारे वनडे स्पर्धेदरम्यान अनेकदा जॉन राईट येरझारा घालताना दिसत असत. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या टॅलंट स्काऊटची (गुणवत्ता हेरणारा प्रशिक्षक) जबाबदारी जॉन राईट यांच्यावर सोपवण्यात आली होती. नित्यनेमाने निष्ठापूर्वक आपली भूमिका चोख पाडणार्‍या जॉन राईट यांच्या पारखी नजरेत जसप्रीत बुमराह भरला.

- Advertisement -

लसिथ मलिंगाच्या छायेत वावणार्‍या जसप्रीत बुमराहने वेगवान गोलंदाजीत झटपट प्रगती केली. विलक्षण योगायोगाची बाब म्हणजे ६ दिवसांत (१ सप्टेंबर, ६ सप्टेंबर) बुमराह आणि मलिंगा या दोघांनी हॅटट्रिक साधण्याचा पराक्रम केला. बुमराहने सबायना पार्कवर झालेल्या सामन्यात डॅरन ब्रावो, ब्रुक्स, चेस यांना गारद करून कसोटी क्रिकेटमध्ये आपली पहिलीवहिली हॅटट्रीक साकारली. मलिंगाने न्यूझीलंडच्या कॉलिन मुनरो, रदरफर्ड, कॉलिन डी ग्रॅडहोम यांना बाद करून कॅन्डी येथे झालेल्या सामन्यात टी-२० क्रिकेटमध्ये बळींचे शतकही साजरे केले! मलिंगाची राऊंडआर्म गोलंदाजीची शैलीदेखील अनोखीच. बुमराहने गेल्या दीड वर्षात विलक्षण वेगाने प्रगती केली असून बळी मिळवण्याचा त्याचा झपाटा लक्षणीयच. दक्षिण आफ्रिका दौर्‍यात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १४ मोहरे टिपले. वॉडरर्स, जोहान्सबर्ग कसोटीत त्याने डू प्लेसिस, डी कॉक, हाशिम आमला यांचा अडसर दूर करून द. आफ्रिकेला रोखले. निर्णायक क्षणी त्यानेच डिव्हिलियर्स, डी कॉक यांचे महत्त्वपूर्ण बळी मिळवून भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. इंग्लंड दौर्‍यात दुखापतीमुळे पहिल्या तीन कसोटी सामन्यांना मुकलेल्या बुमराहने पुढच्या तीन कसोटीत १४ बळी गारद केले. ट्रेंट ब्रिज कसोटीच्या दुसर्‍या डावात त्याने इंग्लंडचा निम्मा संघ गारद करून भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात ४ कसोटीत त्याने २१ विकेट्स काढून भारताच्या मालिका विजयात मोठे योगदान दिले. मेलबर्न कसोटीत त्याच्या अप्रतिम गोलंदाजीने कांगारूंची दाणादाण उडवली. एमसीजीवरील बुमराहच्या बाऊन्सरने मार्कस हॅरिसला चकवले, तर ट्रेव्हिस हेडचा त्रिफळा त्याने उडवला. शॉन मार्शला त्याचा स्लोअर बॉल कळला नाही आणि मार्शला त्याने पायचीत पकडले. चेंडूच्या वेगातील बदल करण्याची त्याची हातोटी विलक्षणच.

विंडीजच्या छोटेखानी दौर्‍यातील दोन कसोटीत १३ बळी ही बुमराहची कामगिरी उत्साहवर्धक. अँटिगा कसोटीत ७ धावांत ५ बळी गारद करताना त्याने कॅम्पबेल, ब्रावो, होप, होल्डर यांचे त्रिफळे उडवले. ही कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय तेज गोलंदाज आहे. कमीत-कमी धावात (किमान) जास्तीत-जास्त बळी (कमाल) ही त्याची कामगिरी भारतासाठी सर्वोत्तम. (वेंकटपथी राजू, रविंद्र जाडेजा, हरभजन, सुभाष गुप्ते, जवगल श्रीनाथ यांनीही किमान धावात कमाल बळी मिळवण्याची किमया केली पण बुमराहच या सर्वांमध्ये उजवा ठरला).

- Advertisement -

बुमराहप्रमाणेच अनुभवी ईशांत शर्माने आपली कामगिरी उंचावल्यामुळे कर्णधार विराट कोहलीच्या खात्यात अनेक विक्रमांची नोंद झाली. विंडीजमध्ये निर्भेळ यश (२-०) मिळवणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला. तसेच सर्वाधिक २८ कसोटी विजय मिळवताना त्याने धोनीला (२७ विजय) मागे टाकले. विंडीजविरुद्ध भारताचा हा सलग आठवा मालिका विजय. २००२ पासून हा विजयी सिलसिला सुरू असून २०१९ पर्यंत त्यात खंड पडलेला नाही. विंडीजची मानहानीकारक पराभवाची मालिका थांबत नाही ही विदारक बाब. गेल्या वर्षी होल्डरच्या विंडीजने इंग्लंडला हरवून विस्डेन करंडक पटकावला. त्यामुळे विंडीजच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, परंतु त्यांचा ‘विस्डेन विजय’ फसवा ठरला. अंतर्गत कलह, बड्या नामचीन खेळाडूंनी टी-२० क्रिकेटच्या मोहापायी कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवल्याची विंडीज क्रिकेटला जबर किंमत मोजावी लागत आहे.

अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी यांना गवसलेला सूर हा भारतासाठी शुभ शकुन. उपकर्णधार रहाणेला धावांसाठी संघर्ष करावा लागला होता. अँटिगा कसोटीत रहाणेने शतक झळकावून ‘सामनावीर’ किताब पटकावला. हैदराबादी हनुमा विहारीने मालिकेत २८९ धावा फटकावल्या. अँटिगा कसोटीत त्याचे शतक थोडक्यात हुकले होते, पण किंगस्टन कसोटीत त्याने शतक झळकावण्यात चूक केली नाही. रहाणे, विहारी फलंदाजीचा भार वाहत असताना इतरांचे अपयश नजरेआड करून चालणार नाही. कर्णधार कोहलीने चार डावात १३६ धावा केल्या, त्यापैकी ७६ धावा तर त्याने किंगस्टन कसोटीतील पहिल्या डावात केल्या होत्या. कोहलीच्या खेळात सातत्याचा अभाव आढळला. कर्णधार म्हणून त्याची कारकिर्द बहरत असताना तो कसोटीतील फलंदाजीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरल्यास आगामी मोसमात भारताची कामगिरी अधिक बहरेल. चेतेश्वर पुजाराला या दौर्‍यात सूर गवसला नाही. लोकेश राहुल, मयांक अगरवाल या बिनीच्या शिलेदारांना आपली कामगिरी उंचवावी लागेल. रिषभ पंतने यष्टींमागे बळीचे अर्धशतक साजरे केले, तरी त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव जाणवतो. मधल्या फळीतील फलंदाज म्हणून त्याने अधिक जबाबदारीने आपली भूमिका पार पाडायला हवी. धोनीच्या निवृत्तीनंतर (कसोटी क्रिकेट) अनेक पर्यायी यष्टीरक्षक आले आणि गेले. यष्टीरक्षकाचा हा संगीत खुर्चीचा खेळ थांबणे भारतीय क्रिकेटसाठी हितावह ठरेल. संजू सॅमसन, ईशान किशन हे रिषभ पंतला पर्याय ठरू शकतील. आगामी भरगच्च मोसमात नवीन राष्ट्रीय निवड समितीला या पर्यायांचा विचार करावा लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -