रहाणेची आठव्या स्थानी झेप

जागतिक कसोटी क्रमवारी

रहाणे

भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत आठव्या स्थानी झेप घेतली आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीनुसार भारताचा कर्णधार विराट कोहली फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी कायम आहे. कोहलीच्या खात्यात ९२८ गुण असून त्याच्यात आणि दुसर्‍या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथमध्ये १७ गुणांचा फरक आहे.

भारतीय संघाचा अखेरचा कसोटी सामना मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध झाला होता. मात्र, असे असतानाही रहाणेला एका स्थानाची बढती मिळाली आहे. आपल्या मागील चार डावांत एक शतक आणि तीन अर्धशतके करणार्‍या रहाणेच्या खात्यात ७५९ गुण असून तो आठव्या स्थानी पोहोचला आहे. रहाणे आणि कोहलीप्रमाणेच चेतेश्वर पुजाराने अव्वल दहा फलंदाजांतील आपले स्थान कायम राखले आहे. तो ७९१ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. गोलंदाजांमध्ये भारताचा जसप्रीत बुमराह सहाव्या स्थानी असून त्याचे ७९४ गुण आहेत. तर रविचंद्रन अश्विन आठव्या आणि मोहम्मद शमी दहाव्या स्थानावर आहे.

अँजेलो मॅथ्यूजला बढती

झिम्बाब्वेविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणार्‍या श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजला फलंदाजांच्या यादीत आठ स्थानांची बढती मिळाली आहे. झिम्बाब्वेविरुद्ध मॅथ्यूजने ४६८ चेंडूत नाबाद २०० धावांची खेळी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. तो आता ६६९ गुणांसह सोळाव्या स्थानी आहे. याच सामन्यात ८० धावा करणारा कुसाल मेंडिस ३० व्या स्थानावरून २६ व्या स्थानी पोहोचला आहे.