घरक्रीडामंजू राणी अंतिम फेरीत

मंजू राणी अंतिम फेरीत

Subscribe

मेरी, जमुना, लोव्हलीनाची कांस्य कमाई, जागतिक महिला बॉक्सिंग

भारताच्या मंजू राणीने (४८ किलो) जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. पहिल्यांदा जागतिक स्पर्धेत खेळणार्‍या मंजूव्यतिरिक्त इतर तीन भारतीय बॉक्सर्सना अंतिम फेरी गाठता आली नाही. सहा वेळची विश्व विजेती मेरी कोम (५१ किलो), जमुना बोरो (५४ किलो) आणि लोव्हलीना बोर्गोहेन (६९ किलो) यांचा उपांत्य फेरीत पराभव झाला. त्यामुळे या तिघींना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

सहाव्या सीडेड मंजूने ४८ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत थायलंडच्या चूथमात रक्सतचा ४-१ असा पराभव केला. आता सुवर्णपदकासाठी रविवारी होणार्‍या अंतिम सामन्यात तिच्यासमोर दुसर्‍या सीडेड रशियाच्या एक्तेरिना पाल्टचेवाचे आव्हान असेल. आपल्या पहिल्याच जागतिक स्पर्धेत खेळताना अंतिम फेरी गाठणारी मंजू ही १८ वर्षांतील पहिली भारतीय महिला बॉक्सर आहे. जमुना बोरोला ५४ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत अव्वल सीडेड चिनी तैपेईच्या हुआंग हसीओ-वेनने ०-५ असे पराभूत केले. तसेच बोर्गोहेनचा चीनच्या यांग लिऊने २-३ असा पराभव केला.

- Advertisement -

दुसरीकडे ५१ किलो वजनी गटात तिसर्‍या सीडेड मेरी कॉमला पराभवाचा सामना करावा लागला. तिला दुसर्‍या सीडेड तुर्कीच्या बुसेनाझ साकिरोग्लूने १-४ असे पराभूत केले. या सामन्यात दोन्ही बॉक्सर प्रतिस्पर्धी आक्रमण करेल याची वाट पाहत होत्या. मेरीने या सामन्यात हुशारीने खेळ केला. परंतु, तरीही पंचांनी तिला पराभूत घोषित केल्याने मेरी निराश होती. मात्र, या स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्याने तिने जागतिक स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळवण्याचा विक्रम आपल्या नावे कायम ठेवला आहे. हे तिचे जागतिक स्पर्धेतील आठवे पदक आहे.

पराभव स्वीकारणे अवघड

- Advertisement -

उपांत्य फेरीतील सामन्यानंतर मेरी कोम म्हणाली, मी या निर्णयाने निराश आहे. मी प्रतिस्पर्धीपेक्षा चांगली खेळले. त्यामुळे हा पराभव स्वीकारणे अवघड आहे. माझ्यासोबत असे काही घडेल याचा मी विचारही केला नव्हता. मला पंचांच्या निर्णयाने धक्का बसला आहे. मात्र, मी या स्पर्धेत ज्याप्रकारे खेळले त्याचा आनंद आहे. मी पुढील स्पर्धांमध्ये दमदार पुनरागमन करेन याची खात्री आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -