घरक्रीडातोच आहे ‘वर्ल्ड का बेस्ट बॉलर’ !

तोच आहे ‘वर्ल्ड का बेस्ट बॉलर’ !

Subscribe

कोहलीने केले कबूल

‘वर्ल्ड का बेस्ट बॉलर? नही यार अभी तो वर्ल्ड के बेस्ट बॅट्समन के दंडे उडाना बाकी है! चिकू भैया (विराट कोहली) आ रहा हूँ’ असे आयपीएलच्या एका जाहिरातीत मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह म्हणतो. आयपीएलमध्ये गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना झाला. मात्र, या सामन्यापेक्षाही मुंबईचा गोलंदाज बुमराह आणि बंगळुरूचा फलंदाज कोहली यांच्यातील सामन्याविषयी चर्चा होती. भारताचे हे दोन खेळाडू सध्याच्या घडीला अनुक्रमे जगातील सर्वोत्तम गोलंदाज आणि फलंदाज म्हणून ओळखले जातात. मात्र, आयपीएलच्या ‘त्या’ जाहिरातीत जोपर्यंत कोहलीला बाद करत नाही, तोपर्यंत मला सर्वोत्तम गोलंदाज म्हणता येणार नाही, असे बुमराह म्हणतो. या सामन्यात आधी कोहलीने काही चौकार लगावल्यानंतर बुमराहने त्याला बाद केले आणि सामना मुंबईच्या दिशेने फिरवला. त्यामुळे सामन्यानंतर कोहलीनेही बुमराहच सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे, असे कबूल केले.

बुमराह आणि मलिंगा यांनी या सामन्यात ज्याप्रकारे गोलंदाजी केली, त्यातून आमच्या गोलंदाजांनाही खूप काही शिकण्यासारखे होते. मी चुकीच्या वेळी बाद झालो. बुमराह हा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. सध्याच्या घडीला तोच जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करायला गेलो ही माझी चूकच झाली. तो संघात असणे हे मुंबईचे भाग्य आहे. जर बुमराह चांगल्या फॉर्मात असेल, तर ती भारतीय क्रिकेटसाठी आनंदाचीच बातमी आहे, असे कोहली म्हणाला. बुमराहने या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूला अखेरच्या ४ षटकांत ४१ धावांची गरज होती आणि एबी डीव्हिलियर्स फटकेबाजी करत असल्याने बंगळुरूच हा सामना जिंकणार असे वाटत होते. मात्र, बुमराहने १७ व्या षटकात अवघी १ धाव देत शिमरॉन हेटमायरला बाद केले, तर १९ व्या षटकात ५ धावा देत कॉलिन डी ग्रँडहोमला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याच्या या कामगिरीमुळेच मुंबईने हा सामना ६ धावांनी जिंकला. २० धावा देत ३ विकेट घेणार्‍या बुमराहलाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

- Advertisement -

बुमराह ‘महान’ खेळाडू – कृणाल पांड्या

हा सामना खूपच चांगला झाला. बुमराहने ज्याप्रकारे गोलंदाजी केली, तो एक महान खेळाडू आहे. तो ज्या सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, मग ते भारतासाठी असो की मुंबई इंडियन्ससाठी, ते खूपच वाखाणण्याजोगे आहे, अशा शब्दांत मुंबईचा अष्टपैलू कृणाल पांड्याने बुमराहची स्तुती केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -