वरळी स्पोर्ट्स क्लब कबड्डी स्पर्धा

प्रेरणा, काळेवाडी उपांत्य फेरीत

निर्धारित वेळेत सामना ३१-३१ असा बरोबरीत राहिल्याने खेळवण्यात आलेल्या पाच-पाच चढायांच्या डावात प्रेरणाने प्रतिज्ञा मंडळाचा ६-५ असा एका गुणाने पराभव करत वरळी स्पोर्ट्स क्लब आयोजित तृतीय श्रेणी कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तसेच आकांक्षा क्रीडा मंडळ, वेस्ली स्पोर्ट्स क्लब आणि काळेवाडीचा विघ्नहर्ता या संघांनीही उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. आता अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी आकांक्षा विरूद्ध प्रेरणा आणि वेस्ली विरूद्ध काळेवाडीचा विघ्नहर्ता असे सामने होतील.

या स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी प्रेरणा आणि प्रतिज्ञा या संघांममधील लढत अत्यंत चुरशीची झाली. प्रेरणा संघाने आक्रमक सुरुवात करत पाचव्या मिनिटालाच प्रतिज्ञावर लोण देत १२-३ अशी आघाडी घेतली. त्यांनी पुढेही चांगला खेळ सुरु ठेवत मध्यंतराला १६-८ अशी निर्णायक आघाडी घेतली, पण दुसर्‍या डावात प्रतिज्ञाने दमदार पुनरागमन केले. इव्हान वासकरला सूर गवसल्याने प्रतिज्ञाने प्रेरणावर लोण चढवत आपली पिछाडी कमी केली. त्यानंतर त्यांनी दमदार खेळ सुरु ठेवत शेवटच्या मिनिटाला ३१-३१ अशी बरोबरी केली आणि सामना पाच-पाच चढायांच्या डावात पोहोचला. यातही चुरस कायम होती, पण शेवटी प्रेरणाने ६-५ अशी बाजी मारत उपांत्य फेरी गाठली.

दुसर्‍या सामन्यात वेस्ली स्पोर्ट्स क्लबने एकतर्फी सामन्यात साई क्लबचा ५७-२१ असा धुव्वा उडवला. काळेवाडीचा विघ्नहर्ता आणि ओम पिंपळेश्वर यांच्यातील लढत काळेवाडीने ३०-२४ अशी जिंकत आगेकूच केली. काळेवाडीच्या आशुतोष भोळे आणि राज बेलोसे यांनी जोरदार चढाया केल्या. आकांक्षा क्रीडा मंडळाने सुरज पाटील आणि कार्तिक यादव यांच्या चांगल्या खेळाच्या जोरावर सूर्यकांत व्यायामशाळेचा ३९-१८ असा फडशा पाडला.