Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा WTC Final : सर्वोत्तम कसोटी संघ एका सामन्यानंतर कळू शकत नाही; कोहलीचा...

WTC Final : सर्वोत्तम कसोटी संघ एका सामन्यानंतर कळू शकत नाही; कोहलीचा ‘बेस्ट ऑफ थ्री’ला पाठिंबा

जगातील सर्वोत्तम कसोटी संघ ठरवण्यासाठी किमान तीन सामने होणे गरजेचे आहे, असे कोहलीला वाटते.  

Related Story

- Advertisement -

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेची अंतिम फेरी ही ‘बेस्ट ऑफ थ्री’ असली पाहिजे. या स्पर्धेचा विजेता किमान तीन सामन्यांच्या निकालाने ठरला पाहिजे, असे विधान काही दिवसांपूर्वी भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले होते. भारताचा कर्णधार विराट कोहलीही प्रशिक्षकांच्या मताशी सहमत आहे. भारताने यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध पहिले सामने गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करत कसोटी मालिका जिंकली होती. परंतु, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यांना ही संधी मिळाली नाही. या स्पर्धेचा केवळ एक अंतिम सामना झाला, ज्यात न्यूझीलंडने ८ विकेट राखून विजय मिळवला. परंतु, जगातील सर्वोत्तम कसोटी संघ ठरवण्यासाठी किमान तीन सामने होणे गरजेचे आहे, असे मत कोहलीने व्यक्त केले.

तीन सामन्यांत संघांची खरी गुणवत्ता कळते

जगातील सर्वोत्तम कसोटी संघ केवळ एका सामन्याच्या निकालावर ठरण्याला माझी सहमती नाही. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत तुम्हाला संघांची खरी गुणवत्ता कळते. पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या संघामध्ये पुनरागमन करण्याची क्षमता आहे का? किंवा पहिल्या सामन्यातील विजेता संघ दमदार कामगिरी सुरु ठेवत ही मालिका जिंकतो का? हे पाहणे चुरशीचे ठरते. केवळ दोन दिवसांच्या खेळावर सर्वोत्तम कसोटी संघ ठरू शकत नाही, असे कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यानंतर म्हणाला.

किमान तीन सामने असणे गरजेचे

- Advertisement -

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरी तीन सामन्यांची झाली पाहिजे. भविष्यात याबाबत विचार होणे गरजेचे आहे. तीन सामन्यांमध्ये दोन्ही संघांना बऱ्याच चढ-उतारांना सामोरे जावे लागते. परिस्थितीत सामन्यागणिक बदलत जाते. त्यामुळे संघांमधील जिद्द आणि त्यांची गुणवत्ता कळते. पहिल्या सामन्यात केलेल्या चुकांमधून तुम्हाला शिकण्याची संधी मिळते. त्यामुळे सर्वोत्तम कसोटी संघ ठरवण्यासाठी किमान तीन सामने असणे गरजेचे आहे, असे कोहलीने नमूद केले.

- Advertisement -