घरक्रीडाWTC Final : कसोटीत वर्चस्वाची लढाई; भारत-न्यूझीलंडचे पहिल्यावहिल्या जेतेपदाचे लक्ष्य

WTC Final : कसोटीत वर्चस्वाची लढाई; भारत-न्यूझीलंडचे पहिल्यावहिल्या जेतेपदाचे लक्ष्य

Subscribe

जागतिक क्रमवारीत सध्या न्यूझीलंड अव्वल, तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकत कसोटीत आपले वर्चस्व सिद्ध करण्याचे दोन्ही संघांचे लक्ष्य असेल. 

कसोटी या क्रिकेटच्या सर्वात पारंपरिक प्रकारातील ‘वर्ल्डकप’ असे ज्याला म्हटले जात आहे, त्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (जागतिक कसोटी अजिंक्यपद) स्पर्धेच्या अंतिम सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. या लढतीत विराट कोहलीचा भारत आणि केन विल्यमसनचा न्यूझीलंड हे संघ आमनेसामने असणार आहेत. कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला कोरोनासारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. परंतु, त्यानंतरही भारत आणि न्यूझीलंड या संघांनी गेल्या दोन वर्षांतील दर्जेदार कामगिरीच्या जोरावर या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत सध्या न्यूझीलंड अव्वल, तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकत कसोटीत आपले वर्चस्व सिद्ध करण्याचे दोन्ही संघांचे लक्ष्य असेल.

कोहली आयसीसीची स्पर्धा जिंकण्यासाठी उत्सुक

कोहली हा कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत ६० पैकी ३६ कसोटी सामने जिंकले आहेत. परंतु, कर्णधार म्हणून कोहलीला अजून आयसीसीची एकही जागतिक स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांची चर्चा करताना आजही कोहलीच्या आधी कपिल देव, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी यांचे नाव घेतले जाते. मात्र, पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद भारताने पटकावल्यास कोहलीचे क्रिकेट इतिहासात एक वेगळे स्थान निर्माण होईल.

- Advertisement -

दोन फिरकीपटू, तीन वेगवान गोलंदाज  

न्यूझीलंडने नुकतेच इंग्लंडमध्ये दोन कसोटी सामने खेळल्याने साऊथहॅम्पटन येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, भारतीय संघ अंतिम सामन्यात न्यूझीलंडला कडवी झुंज देईल यात जराही शंका नाही. भारताच्या फलंदाजीची मदार ही कर्णधार कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे या अनुभवी खेळाडूंसह रिषभ पंत आणि शुभमन गिल या युवा खेळाडूंच्या खांद्यावर असेल. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा या तेज त्रिकुटासह अश्विन आणि जाडेजा हे फिरकीपटू गोलंदाजीची धुरा सांभाळतील.

न्यूझीलंडचा संघ कसोटी क्रमवारीत अव्वल

भारताला हा सामना जिंकण्यासाठी बरीच मेहनत करावी लागू शकेल. न्यूझीलंडचा संघ सध्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असून त्यांना २०१९ एकदिवसीय वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे विल्यमसनचा संघ शुक्रवारपासून सुरु होणारा अंतिम सामना जिंकत कसोटीतील ‘वर्ल्डकप’ आपल्या नावे करण्यासाठी नक्कीच उत्सुक असेल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -