Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा WTC Final : 'या' पाच कारणांमुळे टीम इंडियाची टेस्ट चॅम्पियनशिप हुकली

WTC Final : ‘या’ पाच कारणांमुळे टीम इंडियाची टेस्ट चॅम्पियनशिप हुकली

भारताला आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयश आले.

Related Story

- Advertisement -

न्यूझीलंडने अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभूत करत पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या विजयासह त्यांनी अजिंक्यपदाची गदा आणि साधारण १२ कोटी रुपयांचे रोख बक्षीस आपल्या नावे केले. साऊथहॅम्पटन येथे झालेल्या या सामन्यात पावसाने बराच व्यत्यय आणला होता. पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला होता. मात्र, उर्वरित चार दिवसांत (राखीव दिवशीही खेळ झाला) न्यूझीलंडने दर्जेदार कामगिरी करत पहिले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनण्याचा मान पटकावला. भारताला मात्र आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयश आले आणि भारताची टेस्ट चॅम्पियनशिप हुकली. परंतु, भारताच्या या पराभवाला पाच प्रमुख कारणे ठरली.

फलंदाजांचे अपयश – भारताच्या फलंदाजांना या सामन्यात चांगला खेळ करता आला नाही. भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना खेळपट्टीवर बराच वेळ उभे राहण्यात यश आले, पण ते फारशा धावा करू शकले नाहीत. या सामन्याच्या दोन्ही डावांत भारताच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. रोहित शर्मा (३४ आणि ३०), शुभमन गिल (२८ आणि ८), पुजारा (८ आणि १५), कर्णधार विराट कोहली (४४ आणि १३), अजिंक्य रहाणे (४९ आणि १५) व रिषभ पंत (४ आणि ४१) यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.

- Advertisement -

बुमराहला एकही विकेट नाही – इंग्लंडमधील हवामान आणि खेळपट्ट्या या वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असतात. अंतिम सामन्यात या गोष्टीचा न्यूझीलंडचे सर्व वेगवान गोलंदाज, तसेच भारताकडून पहिल्या डावात ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी फायदा करून घेतला. परंतु, भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दोन्ही डावांत एकही विकेट घेता आली नाही. त्याने पहिल्या डावात २६ षटके, तर दुसऱ्या डावात १०.४ षटके टाकली. परंतु, तो एकही विकेट घेऊ शकला नाही.

संघनिवड करताना चुका – भारताने सामन्याच्या एक दिवस आधीच आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली होती. या सामन्यापूर्वी काही दिवस साऊथहॅम्पटन येथे कडक ऊन होते. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी भारताने अश्विन आणि रविंद्र जाडेजा या दोन्ही फिरकीपटूंना खेळवण्याचा निर्णय घेतला. अश्विनने गोलंदाजीत आपली चमक दाखवत दोन्ही डावांमध्ये २-२ विकेट घेतल्या. मात्र, जाडेजाला फलंदाजीत दोन डावांत मिळून केवळ ३१ धावाच करता आल्या आणि गोलंदाजीत त्याला केवळ एक विकेट मिळाली. त्यामुळे जाडेजाच्या जागी भारताला एक अतिरिक्त फलंदाज किंवा वेगवान गोलंदाजाची निवड करता आली असती.

- Advertisement -

सरावाची कमतरता – न्यूझीलंडच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. त्यामुळे न्यूझीलंडचे सर्व खेळाडू मॅच-फिट होते. तसेच त्यांना इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीचा पुरेसा अंदाज आला होता. दुसरीकडे भारताचे खेळाडू मार्चमध्ये आपला अखेरचा कसोटी सामना खेळले होते. त्यानंतर भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये खेळले, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी त्यांनी केवळ आपापसात एक सराव सामना खेळला. त्यामुळे अंतिम सामन्यात त्यांना सर्वोत्तम खेळ करता आला नाही.

पावसाची जोरदार बॅटिंग – अंतिम सामन्यात पहिले चार दिवस पावसाने जोरदार बॅटिंग केली. पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे एकही चेंडू न टाकताच रद्द करावा लागला होता. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मर्यादित षटकेच टाकली गेली. तसेच हे चारही दिवस ढगाळ वातावरण होते. अशा परिस्थितीत नाणेफेक गमावल्याने भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. याचा त्यांना काहीसा फटका बसला. भारतीय फलंदाजांनी धावा करण्यापेक्षा खेळपट्टीवर टिकण्याला अधिक महत्त्व दिले.

- Advertisement -