WTC Final : पाचव्या दिवसाचे हवामान दिलासादायक; खेळ वेळेवर सुरु होण्याची शक्यता

या सामन्याच्या पहिल्या चार दिवसांत पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे.

southampton weather
पाचव्या दिवसाचे हवामान दिलासादायक

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना सध्या सुरु आहे. साऊथहॅम्पटन येथे होत असलेल्या या सामन्याच्या पहिल्या चार दिवसांत पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांची निराशा झाली आहे. परंतु, पाचव्या दिवसाचे (आज) हवामान दिलासादायक आहे. पाचव्या दिवशी ढगाळ वातावरण असण्याची शक्यता असली तरी फारसा पाऊस पडणार नाही असे म्हटले जात आहे. त्यामुळे पाचव्या दिवसाचा खेळ वेळेवर सुरु होऊ शकेल.

दोन दिवसांचा खेळ शिल्लक

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात आता चार दिवस पूर्ण झाले असले तरी अजूनही दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे. या दोन दिवसांत पाऊस न झाल्यास १९६ षटकांचा खेळ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे अजूनही दोन्ही संघांना विजयाची संधी मिळू शकेल. सध्या या सामन्यात न्यूझीलंडचा संघ फ्रंटफूटवर आहे. भारताचा पहिला डाव २१७ धावांत आटोपला. भारताकडून अजिंक्य रहाणे (४९) आणि कर्णधार विराट कोहली (४४) यांनी चांगली फलंदाजी केली. न्यूझीलंडच्या कायेल जेमिसनने ३१ धावांत ५ विकेट घेतल्या.

न्यूझीलंड २ बाद १०१

भारताच्या २१७ धावांचे उत्तर देताना न्यूझीलंडच्या डावाची उत्तम सुरुवात झाली. डेवॉन कॉन्वे (५४) आणि टॉम लेथम (३०) यांनी ७० धावांची सलामी दिली. अखेर लेथमला अश्विनने बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर कॉन्वे अर्धशतक करून ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यामुळे तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची २ बाद १०१ अशी धावसंख्या होती. चौथ्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नसल्याने न्यूझीलंड पाचव्या दिवशी या धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात करतील.