WTC : फायनल जिंकणाऱ्या संघाला मिळणार आयपीएल विजेत्या संघापेक्षा मोठी रक्कम

सामना अनिर्णित राहिला किंवा रद्द झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात येईल.

Virat Kohli and kane williamson
विराट कोहली आणि केन विल्यमसन

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (जागतिक कसोटी अजिंक्यपद) स्पर्धेच्या अंतिम सामन्याला येत्या शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. जागतिक कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ सध्या अव्वल स्थानावर असून त्यांनी नुकतीच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली. दुसरीकडे भारतीय संघ जागतिक कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असून या संघात कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, जसप्रीत बुमराह यांसारख्या मॅचविनर खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे साऊथहॅम्पटन येथे होणारा अंतिम सामना चुरशीचा होईल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. हा अंतिम सामना जिंकत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावणाऱ्या संघाला तब्बल ११.७२ कोटी रुपये (१.६ मिलियन डॉलर्स) मिळणार आहेत.

११.७२ कोटी आणि गदा आपल्या नावे करणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेची घोषणा केली. अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला ११.७२ कोटी रुपये मिळणार असून हा विजेता संघ कसोटी चॅम्पियनशिपची गदा आपल्या नावे करेल. तसेच उपविजेत्या संघाला ५.८५ कोटी (८ लाख डॉलर्स) रुपये मिळतील. तसेच सामना अनिर्णित राहिला किंवा रद्द झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात येईल. तसेच त्यांना बक्षिसाच्या रकमेची अर्धी-अर्धी रक्कम मिळेल.

आयपीएल विजेत्या संघापेक्षा मोठी रक्कम

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील विजेत्या संघाला ११.७२ कोटी रुपये मिळणार आहेत. ही रक्कम मागील वर्षीच्या आयपीएल विजेत्या संघाला मिळालेल्या रकमेपेक्षा मोठी आहे. मागील वर्षी मुंबई इंडियन्सने आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्यांना बक्षिसाची रक्कम म्हणून १० कोटी रुपये देण्यात आले होते.