घरक्रीडाYear Ender 2022: सरत्या वर्षात 'या' खेळांनी जिंकली प्रेक्षकांची मनं

Year Ender 2022: सरत्या वर्षात ‘या’ खेळांनी जिंकली प्रेक्षकांची मनं

Subscribe

२०२२ हे वर्ष आता अंतिम टप्प्यात आले आहे. हे वर्ष क्रिडा जगतासाठी अविस्मरणीय ठरले आहे. कारण कोरोनाचं सावट संपल्यानंतर यंदाच्या वर्षात संपूर्ण जगभरात अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व क्रीडा प्रेमींनी विविध खेळाच्या माध्यमातून भरपूर आनंद लुटला. त्याचप्रमाणे या वर्षात अनेक खेळाडूंनी जागतिक स्तरावर सर्वोत्त्कृष्ट कामगिरी देखील केली आहे. आयपीएल, फिफा विश्वचषक, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा या खेळांनी अक्षरश: प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या खेळांविषयी माहिती…

फिफा विश्वचषक २०२२मध्ये अर्जेंटिनानं रचला इतिहास

- Advertisement -

फिफा विश्वचषक ही फुटबॉल खेळामधील एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. या स्पर्धेचं दर चार वर्षांनी आयोजन करण्यात येतं. तसेच या स्पर्धेत जगातील ३२ देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ भाग घेतात. नुकताच या स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी कतारमध्ये पार पडला. यावेळी अर्जेंटिना या संघानं फ्रान्सवर मात करत फिफा विश्वचषक २०२२ चा कप हाती घेतला. अर्जेंटिनानं पेनल्टी शुटआऊटमध्ये इतिहास रचत लिओनेल मेस्सीला विजयाचं गिफ्ट दिलं. अर्जेंटिनाच्या संघाने तब्बल ३६ वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्वचषक जिंकला. यावेळी संपूर्ण देशभरातील चाहत्यांकडून एकच जल्लोष साजरा करण्यात आला.

या विश्वचषकात नेहमीप्रमाणे भारताला स्थान मिळाले नाही. कारण भारतीय संघ पुन्हा एकदा फीफा विश्वचषकाची पात्रता फेरी गाठण्यामध्ये अपयशी ठरला. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पात्रता फेरीतील दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र कतार, सौदी अरेबिया, इराण, जपान, आणि दक्षिण कोरिया या आशियातील संघांना सहभागी होण्याची संधी मिळाली.

- Advertisement -

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी

बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. यावेळी भारताने या खेळांमध्ये एकूण ६१ पदकं जिंकली, ज्यामध्ये २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांचा समावेश आहे. या अप्रतिम कामगिरीमुळे भारताने चौथे स्थान पटकावले. खेळाच्या शेवटच्या दिवशी भारताने चार सुवर्णांसह सहा पदकं जिंकली. या चार सुवर्णांपैकी भारताने बॅडमिंटनमध्ये तीन सुवर्ण जिंकले. यावेळी संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये पहिले पदक मिळवले होते. तर, मीराबाई चानूने पहिले सुवर्णपदक पटकावले होते. हॉकीमधील रौप्यपदकाने भारताच्या राष्ट्रकुल स्पर्धेची सांगता झाली होती. राष्ट्रकुल २०२२ मध्ये महिला क्रिकेटचा प्रथमच समावेश करण्यात आला होता. यामध्ये भारतीय महिला संघाने क्रिकेटमध्ये रौप्यपदक पटकावले. यावेळी ऑस्ट्रेलियन संघानं अंतिम फेरीत भारतीय संघाचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरज चोप्राने यावर्षी पुन्हा एकदा देशाचा गौरव केला. डायमंड लीगमध्ये नीरजने सुवर्णपदक जिंकले आणि असं करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याचप्रमाणे बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने यावेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला बॅडमिंटनमधील पहिले सुवर्णपदक जिंकवून देण्याचा मान पटकावला. भारताची स्टार महिला बॉक्सर निखतने यंदाच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. तिने ५२ किलोमध्ये हा इतिहास रचला. पुरुष हॉकी संघाने भारताला शेवटचे पदक मिळवून दिले. मात्र, पुरुष हॉकी संघाला सुवर्णपदकाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून एकतर्फी झालेल्या सामन्यात ७-० असा पराभव पत्करावा लागला आणि त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

१९५८ ते २०२२ या कालावधीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला २०० सुवर्णपदकं मिळाली आहेत. ही देशासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे. दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांनी १९५८च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले होते.

श्रीलंकेच्या संघाचा आशिया चषक २०२२ वर कब्जा

भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये संमिश्र कामगिरी केली आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धा जिंकण्यामध्ये जरी भारत अपयशी ठरला असला तरी मालिकांमध्ये भारतानं चांगली कामगिरी केली आहे. भारतानं आशिया कप नंतर टी-२० विश्वचषक गमावला. परंतु यावेळी कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये काही फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत. कसोटी सामन्यांमध्ये भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने ६ सामन्यांच्या १० डावात ६४.२२ च्या सरासरीने ५७८ धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरने १७ सामने खेळले. परंतु १५ डावांमध्ये ५५.६९ च्या सरासरीने त्याने ७२४ धावा केल्या आहेत. तसेच टी-२० मध्ये सूर्यकुमार यादवने ३१ सामन्यांच्या ३१ डावांमध्ये ४६.५६ च्या सरासरीने ११६४ इतक्या धावा केल्या आहेत.

भारताव्यतिरिक्त श्रीलंकेनेही या वर्षी क्रिकेटमध्ये उत्तृष्ट कामगिरी केली. श्रीलंकेच्या संघाने यावर्षी आशिया चषक २०२२ वर कब्जा केला. श्रीलंकेच्या संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. तर टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये इंग्लंड संघाने दुसऱ्यांदा आपला झेंडा फडकवला. इंग्लंडने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करत घवघवीत यश मिळवलं.

आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा बोलबाला

आपल्या देशात क्रिकेटवर प्रेम करणारे भरपूर लोकं आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे क्रिकेटवरील प्रेम बघून ‘क्रिकेट कंट्रोल बोर्ड’ने भारतात इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात केली. आयपीएलच्या १५ व्या हंगामात एकूण दहा खेळाडूंचा समावेश होता. यावेळी प्रथमच आयपीएल खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाने मोठा विजय मिळवला.

आयपीएल २०२३च्या लिलावात चार खेळाडू मालामाल

आयपीएल १६चा हंगाम पुढील वर्षी पार पडणार आहे. परंतु हा हंगाम सुरू होण्यापुर्वीच आयपीएल २०२३ची लिलाव प्रक्रिया कोची येथे पार पडली. यावेळी संघांनी खेळाडूंवर पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. यावेळी आयपीएलच्या लिलावात चार खेळाडू मालामाल झाले असून त्यांच्यावर १५ कोटींहून अधिक रुपयांची बोली लागली आहे.

इंग्लंडचा सॅम करन आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला १८.५ कोटी रूपयांना पंजाब किंग्जने आपल्या गोटात खेचले. यानंतर ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून ग्रीवर मुंबई इंडियन्सने १७.५ कोटी रूपयांची बोली लावली. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टोक्सला १६.२५ कोटी रूपये बोली लावत अजून एक धमाका केला. निकोलस पुरनला लखनौ सुपर जायंटने १६ कोटी रूपयाला खरेदी केले.


हेही वाचा : टी20 क्रिकेटमधून विराट कोहली घेणार ब्रेक, वरिष्ठ अधिकाऱ्याची माहिती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -