घरक्रीडाहोय, मी केले बॉल टॅम्परिंग!

होय, मी केले बॉल टॅम्परिंग!

Subscribe

आत्मचरित्रात आफ्रिदीचा आणखी एक खुलासा

शाहिद आफ्रिदी सध्या त्याच्या आत्मचरित्रामुळे चांगलाच चर्चेत आहे. आपल्या वयापासून ते गौतम गंभीरपर्यंत त्याने अनेक गोष्टींवर वादग्रस्त विधाने यात केली आहेत. तसेच त्याने आपण २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉल टॅम्परिंग केले होते, अशी कबुलीही त्याने या आत्मचरित्रात दिली आहे. पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असताना आफ्रिदीला एकदिवसीय मालिकेच्या पाचव्या सामन्यात पहिल्यांदा पाकिस्तानचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली होती. त्यांनी याआधीचे चारही सामने गमावले होते, त्यामुळे निराश झालेल्या आफ्रिदीने बॉल टॅम्परिंग करण्याचे ठरवले. त्याने चेंडू तोंडात टाकून त्याच्याशी छेडछाड केली, जेणेकरून पाकिस्तानच्या गोलंदाजांना चेंडू स्विंग करणे सोपे होईल.

आफ्रिदी या प्रकरणाबाबत ‘गेम चेंजर’ नामक आत्मचरित्रात लिहितो, मी पहिल्यांदाच पाकिस्तानचे नेतृत्त्व करत होतो, त्यामुळे मला काहीही करून सामना जिंकायचा होता. त्यातच आम्ही हा सामना पर्थमध्ये खेळत होतो. पर्थमधील खेळपट्टी ही आशियातील संघांसाठी कधीच अनुकूल नसते. पाकिस्तानला हा सामना जिंकण्याची चांगली संधी होती, पण आमच्या गोलंदाजांना थोड्या अधिक मदतीची गरज होती. त्यामुळे कॅमेरासमोरच करोडो लोक बघत असताना, मी अशी गोष्ट केली जी याआधीही बर्‍याच खेळाडूंनी केली आहे. मात्र, ते कॅमेरामध्ये आले नाहीत. मी चेंडूचा चावा घेतला. जेणेकरून चेंडूत खड्डे पडतील आणि त्याचा आम्हाला फायदा होईल. मला जिंकायचे होते. मला जिंकायला आवडते. मी जे केले ते चुकीचे होते आणि त्याबद्दल मी माफी मागतो. मी त्यावेळी भावनिक झालो. मला काहीही करून सामना जिंकायचा होता आणि त्यामुळे मी चेंडूचा चावा घेतला किंवा तसा प्रयत्न केला.

- Advertisement -

सचिनच्या बॅटने केले विक्रमी शतक

युवा शाहिद आफ्रिदीने १९९६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील आपले पहिलेवहिले शतक केले होते. हे शतक त्याने अवघ्या ३७ चेंडूत करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम केला होता. हे शतक करण्यासाठी आफ्रिदीने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरची बॅट वापरली होती. याविषयी आफ्रिदीने आत्मचरित्रात लिहिले की, सचिनने त्याची आवडती बॅट वकार युनुसला सियालकोट येथे नेण्यासाठी दिली होती. सियालकोट क्रीडा साहित्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. तिथे त्या बॅटसारखीच बॅट बनवण्यासाठी सचिनने ती वकारला दिली होती. मात्र, वकारने ती बॅट सियालकोटला नेण्यापूर्वी मला फलंदाजीसाठी दिली. त्यामुळे नौरोबीत शाहिद आफ्रिदीने केलेले पहिले शतक हे सचिन तेंडुलकरच्या बॅटने केले होते, विचार करा.

मला नाही तुलाच डॉक्टरची गरज!

शाहिद आफ्रिदी आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद सध्या चांगलाच गाजतो आहे. गंभीरची कामगिरी फारशी खास नसली तरी त्याला भरपूर अहंकार आहे, अशी टीका आफ्रिदीने आत्मचरित्रात केली आहे. याला सडेतोड उत्तर देताना आफ्रिदीला मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे, असे शनिवारी गंभीरने म्हटले होते. आता आफ्रिदीने पुन्हा एकदा गंभीरला उत्तर दिले आहे. तो म्हणाला, गंभीरलाच डॉक्टरांची गरज आहे. मी पाकिस्तानमध्ये हॉस्पिटल्ससोबत काम करत असून गंभीरला उपचारांसाठी मी स्वतः घेऊन जाईन. भारतीय सरकार पाकिस्तानच्या लोकांना सहसा व्हिसा देत नाही, पण मी प्रत्येक भारतीयाचे पाकिस्तानात स्वागतच करेन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -