घरक्रीडाआफ्रिदीमुळे मला २००९ मध्ये पाकचे कर्णधारपद सोडावे लागले; युनिस खानचा गौप्यस्फोट

आफ्रिदीमुळे मला २००९ मध्ये पाकचे कर्णधारपद सोडावे लागले; युनिस खानचा गौप्यस्फोट

Subscribe

२००९ च्या अखेरीस युनिसने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू युनिस खानने शाहिद आफ्रिदी आणि अन्य माजी सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. २००९ मध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंनी त्यावेळचा कर्णधार युनिसविरुद्ध बंड पुकारले होते. युनिसच्या कर्णधारपदाच्या पद्धतीवर आणि वागणुकीवर खेळाडू नाराज असल्याचे त्यावेळी म्हटले गेले होते. परंतु, यात तथ्य नसून काही सिनियर खेळाडू स्वतः कर्णधार बनण्यासाठी उत्सुक होते आणि त्यामुळे त्यांनी माझ्याविरुद्ध बंड पुकारल्याचा गौप्यस्फोट आता युनिसने केला आहे. खेळाडूंना जर केवळ माझ्या कर्णधारपदाची पद्धत आवडत नव्हती, तर ते माझ्याशी त्याबाबत बोलू शकले असते असे युनिस म्हणाला.

आफ्रिदीने कर्णधार बदलण्याची मागणी केली 

मला कर्णधारपदावरून हटवण्यात यावे अशी खेळाडूंनी इच्छा नसून मी केवळ माझी वागणूक बदलावी असे खेळाडूंना वाटत असल्याचे त्यावेळी म्हटले गेले होते. मात्र, असे होते तर खेळाडू पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एजाज बट यांना जाऊन का भेटले? एका सिनियर खेळाडूने कर्णधार बदल्यात यावा अशी मागणी केली होती. तो खेळाडू शाहिद आफ्रिदी होता. माझ्या मते, त्यावेळी त्याला कर्णधार बनायचे होते, असे युनिसने एका टीव्ही चॅनलशी बोलताना सांगितले. २००९ च्या अखेरीस युनिसने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या जागी एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार म्हणून आफ्रिदीची, तर कसोटी संघाच्या कर्णधारपदी मिस्बाह-उल-हकची निवड झाली होती.

- Advertisement -

केवळ क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले 

सिनियर खेळाडूंच्या या वागणुकीमुळे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरची चार वर्षे केवळ क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंद्रित केले आणि सामना नसताना केवळ स्वतःच्या रूममध्ये बसून राहण्याला पसंती दिल्याचेही युनिसने सांगितले. युनिस हा पाकिस्तानच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असून त्याने ११८ कसोटीत १००९९ धावा, २६५ एकदिवसीय सामन्यांत ७२४९ धावा आणि २५ टी-२० सामन्यांत ४४२ धावा केल्या होत्या.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -