घरक्रीडा२००७ टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये पदार्पण करणाऱ्या भारताच्या 'या' क्रिकेटपटूची निवृत्ती

२००७ टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये पदार्पण करणाऱ्या भारताच्या ‘या’ क्रिकेटपटूची निवृत्ती

Subscribe

त्याने २२ टी-२० आणि ५७ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००७ टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. भारताने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केले होते. या सामन्यात आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा अष्टपैलू युसूफ पठाणला पदार्पणाची संधी मिळाली होती. युसूफने पुढे जाऊन २२ टी-२० आणि ५७ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. मात्र, शुक्रवारी त्याने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ‘मी जेव्हा पहिल्यांदा भारताची जर्सी परिधान केली होती, तो दिवस मला अजूनही आठवतो. त्यादिवशी मी केवळ जर्सी घातली नव्हती, तर माझे कुटुंब, प्रशिक्षक, संपूर्ण देश आणि माझ्या स्वतःच्या अपेक्षांचे ओझे माझ्या खांद्यांवर घेतले होते. लहापणापासून माझे आयुष्य क्रिकेटभोवती फिरत आहे. परंतु, आजचा दिवस वेगळा आहे. मी आता सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे,’ असे युसूफ निवृत्तीची घोषणा करताना म्हणाला.

दोन वर्ल्डकप विजेत्या संघांचा भाग 

भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाणचा भाऊ असणाऱ्या युसूफने ५७ एकदिवसीय सामन्यांत ८१० धावा केल्या, ज्यात दोन शतकांचा समावेश होता. तसेच त्याला ३३ विकेट घेण्यातही यश आले. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने भारताकडून २२ सामन्यांत २३६ धावा करतानाच १३ विकेट घेतल्या. त्याने त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०१२ मध्ये खेळला होता. युसूफ २००७ टी-२० आणि २०११ एकदिवसीय वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता.

- Advertisement -

आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी

युसूफने स्थानिक क्रिकेटमध्ये बडोदाकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. मात्र, खऱ्या अर्थाने तो प्रकाशझोतात आला त्याच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीमुळे. त्याने सुरुवातीच्या काही मोसमांमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली होती. तसेच आयपीएलमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद या संघांकडूनही खेळला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -