झहीर खानच्या सल्ल्यामुळे गोलंदाजीत सुधार – खलील

भारताचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याला भारतीय संघात पोहोचण्यासाठी माजी गोलंदाज झहीर खानच्या सल्ल्याचा फायदा झाल्याचे खलील म्हणाला.

झहीर खान आणि खलील अहमद
भारताचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने आशिया चषक २०१८ या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली होती. त्याने पदार्पणातच हॉंगकॉंगविरुद्ध ३ विकेट घेतल्या होत्या. त्याला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी भारताचा माजी गोलंदाज झहीर खानच्या सल्ल्याचा फायदा झाल्याचे खलील म्हणाला.

परिस्थितीतीनुसार गोलंदाजीत कसे बदल करायचे हे झहीर 

खलील झहीर खानबद्दल म्हणाला, “मी आयपीएलमध्ये २ वर्षे झहीर खानसोबत दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघात होतो. त्यावेळी मी त्याच्याबरोबर खूप वेळ घालवायचो. आयपीएलमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या पीचवर खेळावे लागते. त्यामुळे परिस्थितीतीनुसार गोलंदाजीत कसे बदल करायचे हे तो मला सांगायचा. तो वेळोवेळी मला सल्ले द्यायचा. त्याच्याकडून मी खूप काही शिकलो. त्याच्यामुळे माझ्या गोलंदाजीत सुधार झाला आहे.”

विकेट घेत राहणे हेच लक्ष्य 

क्रिकेट वर्ल्डकप २०१९ सुरू व्हायला अवघे काही महिने बाकी आहेत. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार असल्याने वर्ल्डकप आधीच्या सामन्यांत वेगवान गोलंदाजांच्या प्रदर्शनावर निवडकर्त्यांची नजर असेल. त्यामुळे वर्ल्डकपआधी विकेट घेत राहणे हे खलीलचे लक्ष्य आहे. याबाबत खलील म्हणाला, “वर्ल्डकपआधी काही सामने बाकी आहेत. त्यामुळे वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने हे सामने महत्वाचे ठरू शकतात. मला या सामन्यांमध्ये जास्तीत जास्त विकेट घेणे हे माझे लक्ष्य आहे. जेणेकरून जर माझी वर्ल्डकपसाठी संघात निवड झाली तर माझ्यात खूप आत्मविश्वास असेल आणि माझ्यावर कसलाही दबाव नसेल.”