ZIM vs PAK : झिम्बाब्वेने दिला पाकिस्तानला पराभवाचा धक्का; टी-२० मालिकेत बरोबरी 

पाकिस्तानचा डाव अवघ्या ९९ धावांत आटोपला.

Zimbabwe win
झिम्बाब्वेने दिला पाकिस्तानला पराभवाचा धक्का

गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर झिम्बाब्वेने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला. झिम्बाब्वेने हा सामना १९ धावांनी जिंकला. या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद ११८ धावा केल्या होत्या. याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अवघ्या ९९ धावांत आटोपला आणि त्यांनी हा सामना गमावला. या विजयासह झिम्बाब्वेने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. या सामन्यात झिम्बाब्वेकडून ल्यूक जोंग्वेने १८ धावांत ४ विकेट घेतल्या. त्याला रायन बुर्लने दोन विकेट घेत चांगली साथ दिली. आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत पाकिस्तानचा संघ चौथ्या, तर झिम्बाब्वेचा संघ ११ व्या स्थानी आहे. त्यामुळे झिम्बाब्वेसाठी हे मोठे यश आले.

बाबर आझमची एकाकी झुंज 

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि त्यांनी झिम्बाब्वेला २० षटकांत ९ बाद ११८ धावांवर रोखले. झिम्बाब्वेच्या तिनाशे कामनुहूकाम्वेने ३४ धावांची खेळी केली. तर पाकिस्तानच्या मोहम्मद हसनैन आणि दानिश अझीझने २-२ विकेट घेतल्या. ११९ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव ९९ धावांत आटोपला. कर्णधार बाबर आझमने एकाकी झुंज देत ४१ धावा केल्या. त्याला इतरांची साथ लाभली नाही.