तुम्ही Amazon वर ५ स्टार रेटिंग बघून वस्तू विकत घेता? चीनी कंपन्या करतायत दिशाभूल

Fake Reviews on Amazon
Amazon वर खोट्या रेटिंग

एखादा मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेण्याआधी आपण ई-कॉमर्स साईटवर जाऊन आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंबाबतचा रिव्ह्यू वाचतो. रिव्ह्यू वाचून आपण वस्तू घ्यायची किंवा नाही? हे ठरवत असतो. पण ई-कॉमर्स साईटवर फेक रिव्ह्यू देऊन काही महाभाग लाखो रुपये कमवित असल्याचे समोर आले आहे. Amazon साईटवर खोटे रिव्ह्यू देऊन एका युवकाने तीन महिन्यात १९ लाख रुपये कमविले आहेत. ही माहिती समोर आल्यानंतर Amazon ने २० हजार प्रॉडक्ट रिव्ह्यूज डिलीट केले आहेत.

काही चीनी उत्पादनाच्या कंपन्या पैसे देऊन आपल्या प्रॉ़डक्टबद्दल खोटा रिव्ह्यू लिहून घेत होत्या. फायनान्शियल टाइम्सने याबाबत बातमी दिली आहे. या बातमीनुसार काही टॉप रीव्ह्यूवर्स Amazon वर ५ स्टार रेडिंग देतात. हे फेक रिव्ह्यू देणारे आधी ते संबंधित प्रॉडक्ट विकत घेतात आणि नंतर ५ स्टार रेटिंग देतात. त्यानंतर Amazon कडून त्यांना रिफंड दिला जातो. कधी कधी रिव्हूय देणाऱ्यांना गिफ्टही दिले जाते. फायनान्शिएल टाइम्सने केलेल्या सर्व्हेमध्ये युकेमधील टॉप १० रिव्ह्यूवर्सच्या रेटिंगमध्ये संशयास्पद हालचाली दिसल्या आहेत. या ५ स्टार रेटिंग विशेषतः चीनी उत्पादनांना आल्या होत्या.

जस्टिन फ्रायर नावाचा एक रिव्ह्यूवर Amazon.co.uk वर क्रमांक एकचा रिव्ह्यूवर आहे. त्याने ऑगस्ट महिन्यात १४ लाख रुपयांच्या सामानाचा रिव्ह्यू केला होता. प्रत्येक ४ तासाने तो एका सामानाचा ५ स्टार रिव्ह्यू करत होता. त्यानंतर जस्टिन Amazon वरुन विकत घेतलेल्या वस्तू eBay वर विकून टाकत होता. जून पासून आतापर्यंत जस्टिनने १९ लाख रुपयांचे सामान विकलेले आहे. मात्र जस्टिनने पैसे घेऊन रिव्ह्यू करण्याचा आरोप फेटाळून लावला आहे.

चीनी कंपन्या सोशळ मीडिया ग्रुप आणि मॅसेजिंग App च्या माध्यमातून रिव्ह्यूवर्सशी संपर्क साधतात आणि त्यांच्याकडून फेक रिव्ह्यू करुन घेतात. टेलिग्रामवर असे काही ग्रुप आहेत, जे हजारो ५ स्टार रिव्ह्यू करण्याचा दावा करतात.