फेसबुक, ट्विटर अडचणीत? सरकारच्या नव्या नियमांचे पालन न केल्यास कारवाईची शक्यता

सोशल मीडिया कंपन्यांनी अजून नियम लागू केले नाहीत. 

Twitter was down at midnight on Friday, the service was restored after 1 hour
Twitter Down: शुक्रवारी मध्यरात्री ट्विटर झालं होतं डाऊन, १ तासांनी सुरळीत झाली सेवा

फेसबुक, ट्विटर आणि युट्युब यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्ससाठी केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये नवी नियमावली जाहीर केली होती. या नियमावलीचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांची ताकिद देण्यात आली होती. २५ मे (आज) रोजी ही मुदत संपणार असून नव्या नियमावलीचे पालन न केल्यास फेसबुक, ट्विटर आणि युट्युब यांच्यावर भारतात फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे. परंतु, फेसबुकने सरकारच्या नव्या नियमावलीचे पालन करण्याची तयारी दर्शवली असून त्यांची काही मुद्द्यांवर भारत सरकारसोबत चर्चा सुरु असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. ट्विटर आणि गुगल यांनी मात्र अजून याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.

फेसबुक नियमावलीचे पालन करण्यास तयार 

आम्हाला आयटी नियमांचे नक्कीच पालन करायचे आहे. तसेच भारत सरकारसोबत काही मुद्द्यांवर चर्चा करणे गरजेचे आहे. सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असे फेसबुकचे प्रवक्ते म्हणाले. आमच्या व्यासपीठावर लोकांना मुक्तपणे आणि सुरक्षितरित्या व्यक्त होता यावे यासाठी फेसबुक कटिबद्ध आहे, असेही प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

काय आहे नवी नियमावली?

केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने २५ फेब्रुवारीला सर्व सोशल मीडिया कंपन्यांना नव्या नियमावलीचे पालन करण्याचे आदेश दिले होते. यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती. मंत्रालयाने कंपन्यांना भारतात अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी नियुक्त करण्यास सांगितले होते. नव्या नियमावलीत तक्रारींचे समाधान, आपत्तीजनक पोस्ट आणि कंटेंटवर देखरेख, अनुपालन अहवाल आणि आपत्तीजनक कंटेंट हटवण्यासाठीचे नियम घालून देण्यात आले आहेत. मात्र, सोशल मीडिया कंपन्यांनी अजून हे नियम लागू केले नाहीत.

नव्या नियमांनुसार एक समितीही तयार केली जाणार आहे. या समितीत संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, गृह मंत्रालय, माहिती प्रसारण मंत्रालय, कायदा, आयटी आणि महिला व बाल विकास मंत्रालयातील सदस्यांचा समावेश असणार आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी ऐकण्याचा अधिकार या समितीकडे असणार आहे.