गुगलच्या प्रमुखांची सकाळ गुगलने नाही तर वर्तमानपत्राने होते

Sundar Pichai
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई

तुम्ही रोज सकाळी उठल्यावर काय करता? मोबाईल हातात घेऊन नोटीफिकेशन चेक करता. ट्विटर किंवा इतर Apps वर बातम्या वाचता की गुगल करता. मात्र गुगलचे सीईओ सकाळी उठल्यावर काय करत असतील? तुम्हाला आश्चर्य वाटेल पण गुगलचे सीईओ सुंदर पिचाई सकाळी उठल्यानंतर वर्तमानपत्र वाचतात. सकाळी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय माझा दिवस सुरु होत नाही, असे सुंदर पिचाई यांनी सांगितले आहे. पिचाई रोज सकाळी त्यांचे आवडते वॉल स्ट्रिट जर्नल हे वर्तमानपत्र वाचतात. तेही ऑनलाईन नाही तर ऑफलाईन हार्ड कॉपी घेऊन. इतर सामान्य माणसाप्रमाणेच सुंदर पिचाई यांची देखील सकाळ सुरु होते, याबद्दल त्यांनी एका इंग्लिश संकेतस्थळाशी संवाद साधला.

मद्रास IIT आणि त्यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलेले सुंदर पिचाई हे २००४ साली गुगलमध्ये रुजू झाले होते. कालांतराने ते याच कंपनीचे सीईओ देखील झाले. नुकतेच त्यांच्याकडे गुगलच्या अल्फाबेट या कंपनीचे देखील सीईओ पद देण्यात आले आहे. एवढा सगळा व्याप सांभाळत असताना सकाळी आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते, याबद्दल पिचाई यांनी माहिती दिली. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत पिचाई यांनी सांगितले की, सकाळची सुरुवात करताना मला अंड्याचे ऑम्लेट आणि चहा लागतो. चहासोबत तीन टोस्ट आणि त्यासोबत वाचायला वर्तमानपत्र, हा माझा रोजचा दिनक्रम असल्याचे पिचाई म्हणाले.

सकाळी उठण्याबद्दलच्या आपल्या सवयीबाबत बोलताना पिचाई म्हणाले की, मी रोज सकाळी ६.३० किंवा ७ च्या दरम्यान उठतो. खरंतर सकाळी लवकर उठावे, या विचाराचा माणूस नाही. सकाळी उठून व्यायाम वैगरे करता का? असा प्रश्न विचारला असता पिचाई म्हणाले की, मला सकाळी व्यायाम करायला आवडलं असतं, मात्र मी संध्याकाळीच व्यायामासाठी थोडासा वेळ काढतो.

गुगलसारख्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय सर्च इंजिन कंपनीचे सीईओ असूनसुद्धा पिचाई यांना अजूनही जुन्या पद्धतीने हातात घेऊन वर्तमानपत्र वाचायची सवय आहे. या सवयीबद्दल ते सांगतात की, एका वैज्ञानिक संशोधनानुसार हातात वर्तमानपत्र घेऊन वाचल्यामुळे माहिती जास्त काळ आपल्या लक्षात राहते. तेच डिजीटल वाचलेल्या गोष्टी आपण काही काळाने विसरुन जातो. वॉल स्ट्रिट जर्नल सोबत द न्यू यॉर्क टाइम्स कधीकधी ऑनलाईन वाचत असल्याचे पिचाई यांनी सांगितले.