दर १० पैकी ६ फ्रंटलाइन वर्कर्सना नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब न केल्यास काम गमावण्याची भीती – अहवाल

तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या रोजगार संधींबद्दल भारतातील ८८ टक्के फ्रंटलाइन वर्कर्स उत्साही

Indian frontline workers worry job loss if fail to adapt to new tech
दर १० पैकी ६ फ्रंटलाइन वर्कर्सना नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब न केल्यास काम गमावण्याची भीती - अहवाल

मायक्रोसॉफ्ट इंडियाने आज फ्रंटलाइन वर्कर्सवर भर देणाऱ्या खास वर्क ट्रेंड इंडेक्स अहवालातील निष्कर्ष जाहीर केले. विविध क्षेत्रांमधील फ्रंटलाइन वर्कर्सची माहिती, त्यांच्यापुढील आव्हाने आणि त्यांच्यासाठीच्या संधी यावर या अहवालात भर देण्यात आला आहे. व्यावसायिक परिणामांसोबतच कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि हित जपणे यात समतोल साधण्याची शिफारस यात करण्यात आली आहे. तसेच, या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाला मोठी संधी असल्याचे यात अधोरेखित करण्यात आले आहे.

“मागील दोन वर्षात, इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या तुलनेत आपल्या फ्रंटलाइन वर्कर्सनी या जागतिक महासंकटाचा अतुलनीय भार पेलला आहे. आपण आजही या संकटामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेचा सामना करत आहोत आणि आजही हे फ्रंटलाइन वर्कर्स अर्थव्यवस्थेचा गाडा थांबू नये यासाठी आव्हानांचा सामना करत खंबीर उभे आहेत,” असे मायक्रोसॉफ्ट इंडियाचे सीओओ राजीव सोधी म्हणाले. व्यावसायिक परिणामांना फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे हित जपणे आणि त्यांची प्रगतीशी जोडले जायला हवे, असे स्पष्ट संकेत आमच्या वर्क ट्रेंड इंडेक्समधील संशोधनातून मिळाले आहेत. या वळणावर तंत्रज्ञान साह्य करू शकते, ही बाब फार प्रोत्साहनकारक आहे.”

काळजीवाहू संस्कृती हे फ्रंटलाइनवरील नवे चलन आहे

मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नाडेला यांनी कर्मचाऱ्यांशी असलेले संबंध अधिक दृढ करणे, कंपनीचे ध्येय आणि त्यांचे मॅनेजर्स यांच्याबद्दल आपले मत व्यक्त केले. या संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की या जागतिक महासंकटाने यातील काही बंध अधिक दृढ केले तर काही यात तुटून गेले.

जागतिक महासंकटामुळे बंध अधिक दृढ झाले आणि या संकटाचा सामना करण्यासाठी फ्रंटलाइन वर्कर्स एकमेकांच्या साथीने उभे राहिले. भारतात, ८६ टक्के फ्रंटलाइन वर्कर्सच्या मते या संकटाने आणलेल्या समान ताणतणावांमुळे, ‘त्यांना सहकाऱ्यांसोबत दृढ नाते निर्माण झाल्यासारखे वाटते’. मात्र, नेतृत्व स्थानावरील व्यक्ती आणि कंपनीतील संस्कृतीशी असलेला संबंध तकलादू आहे. ६६ टक्के फ्रंटलाइन वर्कर्सच्या मते नेतृत्वस्थानावरील व्यक्ती कार्यालयातील संस्कृती उभारण्याला प्राधान्य देत नाहीत आणि विभागीय प्रमुख, स्टोअर मॅनेजर्स आणि शॉप फ्लोअर सुपरव्हायझर अशा व्यवस्थापकीय पदावरील व्यक्तींच्या संदर्भात हा आकडा ६९ टक्के इतका आहे.

इतकेच नाही, संवाद कमी होत नाहीए… किंवा वाढतही नाहीए. ६५ टक्के फ्रंटलाइन वर्कर्स म्हणतात की, नेतृत्वाकडील संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. फ्रंटलाइन मॅनेजर्स (६७ टक्के)साठी हे काम काहीसे अधिक कठीण झाले आहे. कारण, त्यांच्यावर असलेल्या व्यक्ती त्यांच्याशीही परिणामकारक पद्धतीने संवाद साधत नाहीत. त्याचवेळी, १७ टक्के फ्रंटलाइन वर्कर्सना वाटते की, कार्यालयीत समस्यांच्या बाबतीत त्यांचे म्हणणे ऐकूनच घेतले जात नाही.

जागतिक संकटामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि कर्मचाऱ्यांच्या गरजा यात कंपन्यांतर्फे समतोल साधला जात आहे. त्यामुळे फ्रंटलाइन वर्कर्सचे हित जपण्यावर भर देणाऱ्या अधिक संधी असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. बिगर-व्यवस्थापकीय पदावरील २३ टक्के फ्रंटलाइन वर्कर्सना कर्मचारी म्हणून आपल्याला फारसे महत्त्व नाही, असे वाटते आणि बहुतांश कर्मचाऱ्यांना (६५ टक्के) वाटते की, शारीरिक दमछाक किंवा मानसिक आरोग्याला पाठबळ देण्यासाठी (६४ टक्के) अधिक प्रयत्न व्हायला हवे होते.

सर्वेक्षणात सहभागी बहुतांश कर्मचाऱ्यांना वाटते की पुरवठा साखळीतील समस्यांबद्दल आणखी बरेच काही करता येऊ शकते (६२ टक्के) आणि कामगारांची कमतरता असल्याने त्यांचे काम फारच कठीण झाले आहे (६४ टक्के). आता आपण या जागतिक महासंकटाच्या तिसऱ्या वर्षात पदार्पण करत असताना ४१ टक्के फ्रंटलाइन वर्कर्सना वाटते की, येत्या वर्षात कामाचा ताण असाच राहील किंवा कदाचित वाढेलच. आर्थिक आव्हानांसोबतच भारतातील फ्रंटलाइन वर्कर्सनी कामाशी संबंधित ताणामागे कोविड नियमावली (४४ टक्के), अधिक कामाचा बोजा (४२ टक्के), ग्राहकांच्या गरजांचे व्यवस्थापन (३८ टक्के) आणि कामाचे ठरलेले तास असणे (३६ टक्के) ही पाच कारणे असल्याचे नमूद केले.

फ्रंटलाइन वर्कर्स आता बदलाच्या वळणावर

भारतातील फ्रंटलाइन वर्कर्सनी नोकरी बदलण्यामागील तीन महत्त्वाची कारणे नोंदवली आहेत – अधिक पैसे मिळवणे, नवी कौशल्ये विकसित करण्याची संधी आणि अधिक चांगले कर्मचारी लाभ. कॉर्पोरेट आणि फ्रंटलाइन यांच्यातील दुवा असणाऱ्या फ्रंटलाइन मॅनेजर्सच्या संदर्भात बोलायचे झाले तर या डेटानुसार, संस्कृती आणि संवादातील दरी भरून काढण्याचा ताण त्यांना जाणवत आहे. आपल्या आयुष्यावर कामाचा काय परिणाम होत आहे यावर आता अधिकाधिक फ्रंटलाइन वर्कर्स विचार करत आहेत आणि ‘ग्रेट रिशफल’चा भाग बनत आहेत. अशा परिस्थितीत, सर्वोत्कृष्ट मॅनेजर्स आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदांकडे आकर्षिक करू शकतील असे ऑपरेटिंग मॉडेल आणि संस्कृती निर्माण करण्याची प्रचंड मोठी संधी कंपन्यांकडे आहे.


हेही वाचा – ‘Whatsapp’ च्या नव्या फीचरमध्ये आता तुमच्याबद्दल कोण काय बोलतयं हे कळणार