4G ला बायबाय, आता येणार 5G !

क्वॉलकॉम कंपनीने तुमच्या स्मार्टफोन्सना 5G नेटवर्कशी जोडेल, असा एक खास अँटिना तयार केला आहे.

Qualcomm_QTM052_Antenna_Module
फोटो सौजन्य- Qualcomm

इंटरनेटच्या 4G स्पीडनंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते 5G टेक्नॉलॉ़जीचे. मात्र, 5G प्रणाली भारतात आणण्यासाठी अद्याप बऱ्याच तांत्रिक गोष्टींची जुळवाजुळव करण्याची आवश्यकता असल्याचं आणि त्याकरता अजून काही काळ लागणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र, यादरम्यान अमेरिकेतील क्वॉलकॉम या कंपनीने 5G नेटवर्कच्या दिशेने एक यशस्वी पाऊल टाकले आहे. क्वॉलकॉम ही तंत्रज्ञान निर्मितीतील अग्रगण्य कंपनी स्मार्टफोन्ससाठीच्या QTM052 mmWave या 5G अँटिनाची निर्मिती केली आहे. नुकतीच या कंपनीने याविषयीची अधिकृत घोषणा केली आहे. हा छोटासा अँटिना स्मार्टफोन्सना 5G नेटवर्कला जोडण्यासाठी मदत करेल, असं क्वॉलकॉमच्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

उल्लेखनीय कामगिरी

क्वॉलकॉम कंपनीने लावलेला हा 5G अँटिनाचा शोध एक उल्लेखनीय कामगिरी म्हणावी लागेल. कारण 5G नेटवर्कच्या क्षेत्रात अद्याप जगातील कोणत्याच कंपनीने इतकी प्रगती केलेला नाही. दरम्यान स्मार्टफोनला जलद गतीने 5G नेटवर्कशी जोडणाऱ्या या अँटिना बनवून तयार असला, तरी यावर अजून बरच काम शिल्लक असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. संबंधित अँटिना स्मार्टफोनला जोडण्यासाठीचं तंत्रज्ञान तसंच हा अँटिना 5G नेटवर्क ‘कॅच’ करु शकेल यासाठी लागणारी प्रणाली विकसीत करण्यावर आणि mmWave हार्डवेअर असलेले स्मार्टफोन्सवर काम सुरु असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

5G च्या जगात फायदेशीर

क्वॉलकॉम कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी विकसीत केलेला हा QTM052 अँटिना, 5G च्या जगात खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे. साधारण बोटाच्या पेराएवढा लहान आकार असलेला हा अँटिना, मोबाईल फोन्सना अॅटॅच केलेला असेल. 5G नेटवर्क टॉवरच्या परिघात आल्यानंतर हा अँटिना अॅक्टिव्ह होईल आणि तुमच्या मोबाईलला जलद गतीने 5G नेटवर्कशी जोडेल. दरम्यान हा अँटिना २०१९ पर्यंत परिक्षणासाठी पूर्णत: तयार असेल, अशी शक्यता क्वॉलकॉम कंपनीकडून वर्तवण्यात आली आहे.