ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते सफाईसाठी 01 सप्टेंबरपासून नवीन व्यवस्था सुरू होत आहे. ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या मोहिमेत ठाणे शहरात स्वच्छतेचे नवे पर्व सुरू होत असून सफाईची जबाबदारी नवीन शिलेदारांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. त्यात सफाईच्या वेळा, गणवेश, साधने यात बदल केला जात आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. (A new era of cleanliness in Thane city in Chief Minister Eknath Shinde Thane campaign)
ठामपा क्षेत्रात साफसफाईसाठी महापालिकेच्या सेवेतील सफाई कर्मचारी आणि कंत्राटदारांकडून नेमलेले सफाई कर्मचारी कार्यरत असतात. 01 सप्टेंबरपासून कंत्राटी सफाई कंत्राटदारांच्या नवीन कंत्राट कालावधीस सुरूवात होणार आहे. स्वच्छतेचा दर्जा चांगला असावा यासाठी संबंधित कंत्राटांमध्ये अटी शर्तीत सुधारणा करण्यात आल्या आहेत. महापालिका क्षेत्रात एकूण 23 गट सफाईसाठी कार्यरत असतील. त्यांचा वार्षिक खर्च सुमारे 45 कोटी रुपयांच्या घरात आहे.
‘वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जावे’
दररोज सकाळी सहा वाजता रस्ते सफाईचे काम सुरू होणे आणि सकाळी 8.30 वाजेपर्यंत महापालिका क्षेत्रातील सर्व मुख्य रस्त्यांची सफाई केली पूर्ण जाणे अपेक्षित आहे. त्यानंतर अंतर्गत रस्ते साफ केले जातील. हे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जावे असे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले आहेत. पहिल्या दिवसापासून ही कालमर्यादा पाळली जावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर, दुपारी चार ते रात्री 12 या वेळेत दुसऱ्या टप्प्यातील सफाई केली जाणार आहे. आतापर्यंत एका गटामार्फत रात्र पाळीतील सफाई होत होती. त्यात आणखी एका गटाची भर घालण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य
कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याना यापुढे वेगळे गणवेश दिले जातील. त्यातही सकाळी काम करणाऱ्यांचा गणवेश रंग वेगळा असेल. तर, संध्याकाळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गणवेश वेगळा राहील. महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी पूर्वीप्रमाणेच खाकी गणवेश परिधान करतील.
कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होतील
शहर स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांकडून उत्कृष्ट कामाची अपेक्षा ठेवली जाते. त्याचवेळी त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होतील आणि त्यांच्या व कुटुंबियांच्या आरोग्याची नियमितपणे तपासणी या बाबीही सुनिश्चित करण्यात आल्याचे आयुक्त बांगर म्हणाले.त्याचबरोबर, कंत्राटी कर्मचारी यांची भविष्य निर्वाह निधी आणि राज्य कामगार विमा आयोग यांची प्रदाने संबंधित प्राधिकरणाकडे भरल्याशिवाय कंत्राटदारांची मासिक देयके अदा केली जाणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले आहेत.
नवीन त्रिकोणी झाडू
आतापर्यंत लांब झाडूने सफाई करण्याची पद्धत होती. यापुढे सर्व सफाई कर्मचाऱ्यांना कडक काड्या असलेले त्रिकोणी झाडू देण्यात येणार आहेत. या झाडूमुळे अधिक चांगली सफाई करता येईल. रस्त्यावर चिकटलेला कचरा, ओली माती काढणे, कोपरे साफ करणे या झाडूमुळे शक्य होणार आहे.
(हेही वाचा: यंदाच्या गणेशोत्सवानिमित्ताने STकडून 11 स्थानकांसाठी 35 तात्पुरते थांबे; विशेष 1 हजार 400 जादा गाड्या )
ओवळा गट वाढवला
महापालिका क्षेत्रात सफाईच्या कामासाठी एकूण २३ गट कार्यरत आहेत. त्यात आता ओवळा भागासाठी स्वतंत्र गट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे वाढत्या ठाण्यातील साफसफाईच्या कामाला त्यामुळे स्वतंत्र मनुष्यबळ मिळणार आहे. निरीक्षक आणि त्यांच्यासोबतच विभागनिहाय स्वच्छता कर्मचारी असे गट महापालिका क्षेत्रात कार्यरत असतात. एकूण १३ कंत्राटदारांच्या मदतीने २३ गटांच्यामार्फत शहर स्वच्छतेचे काम केले जाणार आहे.
कचरा वाहण्यासाठी नवीन डबे
रस्ते झाडून जमा झालेला कचरा वाहून नेण्यासाठी आतापर्यंत पत्र्याची गाडी वापरली जात असे. यापुढे टप्प्याटप्याने सगळीकडे १२० किंवा २४० लिटरचे डबे दिले जाणार आहेत.
आणखी यांत्रिकी गाड्या
शहरातील वाढती लोकसंख्या तसेच, झपाट्याने होणारा विकास लक्षात घेता आणि रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाचे वाढते प्रमाण पाहता यांत्रिकी पद्धतीने साफसफाईवर अधिक भर देणे गरजेचे आहे. सध्या दोन गाड्यांद्वारे यांत्रिकी पद्धतीने सफाई केली जात आहे. त्यात लवकरच आणखी चार गाड्यांची भर पडणार आहे. एकूण सहा गाड्यांद्वारे प्रमुख रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने सफाई करून त्या रस्त्यांवरील मोकळे झालेले मनुष्यबळ अंतर्गत रस्त्यांवर वळवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त बांगर यांनी दिली.