ठाण्यातील लसीकरण केंद्रातून १०० डोस गायब; जेष्ठ नगरसेवक मणेरा यांचा स्थायी समितीत आरोप

There is no injection of Chikungunya in Thane Municipal Hospital; The General Assembly revealed a shocking matter
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात चिकनगुनियाचे इंजेक्शनच नाही; महासभेत धक्कादायक बाब उघडकीस

ठाण्यातील लसीकरण केंद्रातून १०० डोस गायब; जेष्ठ नगरसेवक मणेरा यांचा स्थायी समितीत आरोप
एकीकडे लसीच्या मर्यादित पुरवठ्यामुळे ठाणे महापालिकेवर लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ ओढवली असताना दुसरीकडे मात्र घोडबंदर येथील एका लसीकरण केंद्रावर उपलब्ध झालेल्या २०० डोसच्या साठ्यापैकी १०० डोसचा साठा गायब झाल्याचा धक्कादायक आरोप गुरुवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा यांनी केला . गायब झालेल्या १०० डोसचा साठा तेथील डॉक्टरांकडून केला जात असल्याची माहिती त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली . विशेष म्हणजे २०० डोस उपलब्ध असताना केवळ १०० डोसच का देण्यात आले ? या प्रश्नावर उर्वरित लसीचा साठा दोन नगरसेवक घेऊन गेले असल्याचे वादग्रस्त उत्तर या डॉक्टरांकडून देण्यात आल्यानंतर हे उत्तर देखील खोटे असल्याचे सिद्ध झाले .

लसींचा काळाबाजार तर होत नाही ना , अशी शंका उपस्थित करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून डॉक्टरांवर कारवाईची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे . रेमडीसीवीर बरोबर लसींचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याने लस उपलब्ध झाल्यास लसीकरण केंद्रांवर लांबच्या लांब रांगा लागत आहे . काही वेळा तर लस उपलब्ध न झाल्यास ते केंद्रच बंद ठेवण्यात येत असून यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे . त्यातच नगरसेवक नरेश मणेरा यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या महत्वाच्या प्रश्नाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले . घोडबंदर येथील लसीकरण केंद्रावर हा गैरकारभार सुरु असल्याची धाणे महानगरपालिका माहिती त्यांनी स्थायी समिती सभागृहात दिली . या लसीकरण केंद्रावर २०० डोस उपलब्ध होते . मात्र या ठिकाणी काम करत असलेल्या डॉक्टरांनी केवळ १०० टोकन देऊन या १०० लोकांनाच लस दिली . उर्वरित १०० लस बाबत स्वतः मणेरा यांनी विचारणा केली असताना दोन नगरसेवकांकडे या लस उपलब्ध असल्याचे उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले .

मात्र प्रत्यक्ष नगरसेवकांना देखील विचारणा करण्यात आल्यानंतर असा काही प्रकार झालाच नसल्याचे त्यांनी सांगितले . त्यानंतर १५० लोकांचे लसीकरण करण्यात आले असल्याचे उत्तर देऊन या डॉक्टरांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला . या दोन ते तीन दिवसात १०० डोसचा साठा गायब असल्याचा आरोप नरेश मणेरा यांनी केला असून या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे . हा सर्व धक्कादायक प्रकारानंतर आता लसीचा काळाबाजार होत नाही ना ? अशी शंका आता स्थायी समिती सदस्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे . याचदरम्यान ठामपा स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी या दोन्ही डॉक्टरांना त्यांच्या दालनात स्थायी समितीची बैठक झाल्यानंतर बोलावण्याचे आदेश दिले . या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल , असे आश्वासनही दिले .