घरठाणेआश्रमशाळेतील १०९ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

आश्रमशाळेतील १०९ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

Subscribe

शहापूर ।  शहापूर तालुक्यातील भातसई येथील संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील १०९ विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणानंतर विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. बाधित विद्यार्थ्यांना शहापुरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतील जेवण न देता बाहेरचे जेवण दिल्याची प्राथमिक चर्चा आहे. या संतापजनक प्रकारामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पहिली ते दहावी पर्यंत असलेल्या शहापुर तालुक्यातील भातसई येथील संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेत सुमारे २०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज दुपारी विद्यार्थ्यांनी पुलाव व गुलाबजामचे जेवण केल्यानंतर ४६ मुले व ६३ मुली अशा १०९  विद्यार्थ्यांना उलटीचा त्रास होऊ लागल्याने एकच गोंधळ उडाला. या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तातडीने शहापुर उपजिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रसाद भंडारी यांनी सांगितले. दरम्यान, विद्यार्थ्यांना अंत्यविधीच्या किंवा वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे जेवण दिल्याची प्राथमिक चर्चा असून या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जानू हिरवे यांनी यावेळी केली. यावेळी पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे, तहसीलदार कोमल ठाकूर, पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, निवासी नायब तहसीलदार वसंत चौधरी तसेच आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी उपजिल्हारुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली.

- Advertisement -

आदिवासी विकास प्रकल्पासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी प्राप्त होत असतानाही आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गावा मध्ये असलेल्या एका अंत्यविधीच्या कार्यक्रमाचे जेवण दिल्याची प्राथमिक चर्चा   रुग्णालयात सुरू होती. मात्र या गोष्टीची पुष्टी अद्याप कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याने केलेली नसली तरी आजचे पुलाव व गुलाबजाम चे जेवण बाहेरून आले असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. शासनाकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या जेवणात गुलाबजाम कसे आले याबाबत तर्क वितर्क केले जात असल्याने आदिवासी संघटना मात्र या गंभीर प्रकारामुळे आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान, या संतापजनक प्रकारामुळे रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याने  रुग्णालयात दंगल नियंत्रण पथक पाचारण करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -