अंबरनाथ शिवमंदिराच्या सुशोभिकरणासाठी १३८ कोटी मंजूर

एक हजार वर्षापूर्वीचे अंबरनाथ चे प्राचीन शिवमंदिराच्या सुशोभिकरणाचे संपूर्ण कामकाज पाषाणात केले जाणार असून या साठी 138 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.
अंबरनाथमध्ये विकास कामांचा सविस्तर प्रकल्पअहवाल सादर केल्यानंतर त्यास सार्वजनिक बांधकाम विभागाची
तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

नवी दिल्लीतील केंद्रीय स्मारक प्राधिकरणात 14 फेब्रुवारी,2023 रोजी झालेल्या बैठकीत शिवमंदिरापासून शंभर मीटर अंतराबाहेर करण्यात येणार्‍या कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वारासमोरील चौकात नंदीवाहनतळ, प्रदर्शन केंद्र,अ‍ॅम्पी थिएटर, संरक्षक भिंत, मुख्य रस्ता आणि अंतर्गत रस्ते क्रीडांगण आणि स्वच्छतागृह, चेक डॅम. भक्त निवास घाट आणि संरक्षक भिंत इतकी कामे मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी भक्तनिवास आणि उल्हासनगरकडील घाटांचे प्रस्ताव काही सुधारणाकरून पुन्हा मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश केंद्रीय स्मारक प्राधिकरणाने दिले आहेत. त्यानुसार त्वरित सुधारित प्रस्ताव पाठविण्यात येत आहे. उर्वरित नऊ कामांना त्यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. शिवमंदिराच्या परिसरात दरवर्षी प्रमाणे यंदा देखील डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणारा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल 16 ते 19 मार्चदरम्यान रंगणार आहे. यंदाही अनेक प्रसिध्द कलाकारांची उपस्थिती या कार्यक्रमाला असेल.

उल्हासनगरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सहा महिन्यात सुरू होणार -श्रीकांत शिंदे
उल्हासनगरात महानगर पालिकेच्या रुग्णालयाची पाहणी करताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी या रुग्णालयाचे मल्टिस्पेशलिटी हास्पिटलमध्ये रूपांतर करण्या साठी कॅन्सलटिंग नेमण्याची सूचना मनपा आयुक्तांना दिली. हे हॉस्पिटल सहा महिन्यात नागरिकांसाठी खुले होईल असे शिंदे म्हणाले. उल्हासनगर पालिकेचे सेंच्युरी रेयॉनजवळ अँटेलिया हे दोनशे बेड्सचे हॉस्पिटल आहे. या हॉस्पीटलची शिंदे यांनी बुधवारी पाहाणी केली. यावेली मनपा आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त डॉ करुणा जुईकर, शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, शहर संघटक नाना बागुल यांच्या समवेत शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.