घरठाणेठाणे जिल्ह्यातील १५ शाळांना लागले टाळे

ठाणे जिल्ह्यातील १५ शाळांना लागले टाळे

Subscribe

 जिल्ह्यात ३७ शाळा अनधिकृत

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात देखील दिवसेंदिवस अनधिकृत शाळांची संख्या वाढत आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यात युडायस २०२२-२३ च्या नुसार ३७ शाळा अनधिकृत असल्याचा ठपका त्यांच्यावर लागला. त्यापैकी १५ शाळांना कायमचे टाळे लावण्यात आले आहे. तर अंबरनाथ येथील ३ शाळा चालकांविरोधात गुन्हे दाखल झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. दरम्यान जिल्ह्यात यंदाच्या वर्षी एकही अनधिकृत शाळा सुरु होणार नाही याची दक्षता घेतल्याची माहितीही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली.

ठाणे जिल्ह्यातील सर्व स्तरातील व घटकातील बालकांना उच्च व चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळावे ही सर्वच पालकांची इच्छा असते. त्यामुळे इंग्रजी माध्यामंसह मराठी माध्यमातील नावाजलेल्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी झटत असतात. मात्र, त्या शाळेत प्रवेश न मिळाल्याने पालक आपला मोर्चा इतर खासगी शाळांकडे वळवीत असतात. परंतु, शाळा प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेला शासनाची मान्यता आहे का हे पडताळून न पाहता, पालक प्रवेश घेत असतात. कालांतराने त्या शाळेला शासनाची मान्यता नसल्याचे समोर आल्यानंतर पालकांची फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. त्यात शिक्षण हक्क कायदयातील कलम १८ नुसार कोणतीही शाळा संबंधीत शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यता, ना हरकत प्रमाणपत्राशिवाय सुरू करता येत नाही असे नमुद केले आहे. कायदयाच्या कलम १८ (५) अन्वये राज्य मंडळाशी संलग्नित शाळांकरीता राज्यशासनाचे परवानगी आदेश व सीबीएससी, अयसीएससी, आयबी, आयजीसीएसई, सीआयई आदी मंडळाशी संलग्नित शाळांकरीता राज्यशासनाचे नाहरकत प्रमाणपत्र या आदेशा शिवाय शाळा सूरु असल्यास अशा शाळा अनधिकृत शाळा म्हणून घोषित करण्यात येत असतात.

- Advertisement -

दरम्यान, ठाणे जिल्ह्यात युडायस २०२२-२३ नुसार प्राथमिक विभागाच्या ३७ शाळा अनधिकृत असून त्या सर्व शाळांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यामतून नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. त्यापैकी १५ शाळा पूर्णतः बंद करण्यात आल्या आहेत. तर, अंबरनाथ तालुक्यातील तीन शाळा चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच उर्वरित शाळांच्या विरोधात देखील कारवाई प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली. त्यामुळे अशा अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

“ठाणे जिल्ह्यातील आणखी शाळांचा ३१ मे अखेरपर्यंत सर्व्हे पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच मागील वर्षी जिल्ह्यात आढळून आलेल्या अनधिकृत शाळांपैकी ३ शाळाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच यंदाच्या वर्षी जिल्ह्यात एक ही अनधिकृत शाळा सुरु होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. ”
– डॉ, भाऊसाहेब कारेकर, शिक्षणाधिकारी, (प्रा), जि.प.ठाणे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -